Kane Williamson About Fractured Thumb: भारताची अग्नीपरीक्षा रविवारी आहे. भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार असून दोन्ही संघांनी अद्याप वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ अराजित राहण्यासाठी प्रयत्न करतील. भारतासाठी टेन्शन वाढवणारी बातमी म्हणजे 2003 नंतर भारत एकदाही आयसीसीच्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडला पराभूत करु शकलेला नाही. मात्र भारतासाठी एक थोडा दिलासा देणारी बातमी म्हणजे या सामन्यामध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन खेळणार नाही. केन विलियम्सनच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तो या सामन्यात खेळणार नाही. केन विलियम्सन या स्पर्धेमध्ये केवळ बांगलादेशविरुद्धचा सामना खेळला होता. त्याने 107 धावांमध्ये नाबाद 87 धावा केल्या होत्या. या सामन्यामध्येच तो रिटायर हर्ट झाला होता. यानंतर तो एकही सामना खेळलेला नाही. अशातच आता केन विलियम्सनने आता त्याचा अंगठा फ्रॅक्चर होण्यासाठी एक भारतीय जबाबदार असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. केन विलियम्सनने यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.
वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होण्याआधी अहमदाबादच्या स्टेडियममध्ये सर्व कर्णधारांचे विशेष फोटोशूट झाले होते. वर्ल्ड कपच्या ट्रॉफीबरोबर झालेल्या या फोटोशूटसाठी वर्ल्ड वाईड रसलिंग म्हणजेच 'डब्ल्यूडब्लूई'चा सुपरस्टार ग्रेट खलीही उपस्थित होता. ग्रेट खलीने सर्व कर्णधारांची भेट घेतली. अगडदांड खली समोर सर्वजण अगदी लहान मुलांसारखे वाटत होते. खलीबरोबर फोटो काढण्याचा मोह कर्णधारांनाही आवरला नाही. केन विलियम्सननेही खलीबरोबर हस्तांदोलन करतानाचा फोटो काढला. हा फोटो शेअर करत केन विलियम्सनने आपला अंगठा यामुळेच दुखावल्याचा दावा केला आहे.
केननेच हा खुलासा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन केला आहे. "माझा अंगठा नेमका कधी फ्रॅक्चर झाला. खरं तर असं काही नाही पण खरोखरच हा अगदी स्ट्राँग हॅण्डशेक होता. द ग्रेट खलीला भेटून फार आनंद झाला," अशी कॅप्शन केन विलियम्सनने दिली आहे. हा फोटो आयसीसीच्या सौजन्याने केनने शेअर केला असून हसणाऱ्या इमोजीसहीत शेअर केला आहे. अर्थात हे वेगळं सांगण्याची गरज नाही की केनने ही पोस्ट मस्करीमध्ये शेअर केली आहे.
केन विलियम्सन आता थेट नोव्हेंबर महिन्यामध्ये खेळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेमध्येही केन विलियम्सन खेळणार की नाही हे स्पष्ट नव्हतं. अखेर अगदी शेवटच्या काही दिवसांमध्ये केन विलियम्सनला वर्ल्ड कपच्या संघात स्थान देण्यात आलं. मात्र केन विलियम्सन दोन्ही सराव सामने खेळल्यानंतर इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना खेळला नव्हता. त्यानंतरचा केवळ बांगलादेशविरुद्धचा सामना केन विलियम्सन खेळला आणि पुन्हा 2 सामन्यांमधून तो बाहेरच होता. तो आता नोव्हेंबरमध्येच न्यूझीलंडच्या संघातून खेळताना दिसेल. भारताविरुद्धही केन खेळणार नाही.