एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा खराब फॉर्म कायम आहे. सलग पराभवामुळे खचलेला संघ किमान अफगाणिस्तान संघाला तरी आव्हान देत विजयी होईल असा अंदाज होता. पण तुलनेने दुबळ्या अफगाणिस्तान संघानेही पाकिस्तानला अक्षरश: लोळवत लाजिरवाणा पराभव केला. पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव असून सेमी फायनल गाठण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. आता आणखी एका पराभवासह पाकिस्तानी संघ स्पर्धेतून बाहेर होणं नक्की होईल. भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर अफगाणिस्ताननेही पराभव केल्याने पाकिस्तान संघाची नाचक्की झाली आहे. पाकिस्तान संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, पाकिस्तान आता न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याशी भिडणार आहे.
पाकिस्तानने प्रथम फंलदाजी करताना अफगाणिस्तानसमोर 283 धावांचं आव्हान ठेवलं होतं. अफगाणिस्तान संघाने चांगली सुरुवात केली होती. दुसरीकडे पाकिस्तानी गोलंदाज मात्र विकेट्स घेण्यात अपयशी ठरत होते. एकीकडे गोलंदाजांची नाचक्की झालेली असताना, खराब क्षेत्ररक्षणाने त्यात भर घातली. पाकिस्तान संघाचे खेळाडू इतकं खराब क्षेत्ररक्षण करत होते की, त्यांचे कोच आणि टीम संचालक मिकी आर्थरही संतापले होते. एका क्षणी तर ते इतके चिडले की, उठून ड्रेसिंग रुमच्या दिशेने चालत गेले.
Us Mickey bhai us pic.twitter.com/ZtX9mto2nh
— Salman (@syedsalman97) October 23, 2023
भारताविरोधातील पराभवानंतर पाकिस्तानी संघावर टीका होत असताना दुसरीकडे मिकी आर्थर यांनी एक अजब विधान केलं होतं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेला हा सामना बीसीसीआय नव्हे तर आयसीसीने आयोजित केल्याचं वाटत होतं असं ते म्हणाल्याने वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण झाला होता. यानंतर पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू वसीम अक्रम यांनीही त्यांच्या विधानाचा समाचार घेतला होता.
'BCCI चा कार्यक्रम वाटतो' म्हणणाऱ्या पाकिस्तान कोचला ICC ने दिलं उत्तर, म्हणाले 'काही केलं तरी...'
"हे पाहा, खरं सांगायचं तर आजचा सामना हा अजिबात आयसीसीने आयोजित केलेला वाटला नाही. मी खोटं सांगणार नाही. ही द्विपक्षीय मालिका वाटत होती. बीसीसीआयने याचं आयोजन केल्यासारखं वाटत होतं. मला मायक्रोफोनवरुन एकदाही 'दिल दिल पाकिस्तान' ऐकायला मिळालं नाही," असं मिकी आर्थर म्हणाले होते.
"या गोष्टी नक्कीच फरक पाडतात. पण मी हे पराभवाचं कारण म्हणून वापरणार नाही. हा प्रश्न तो क्षण जगण्याचा, पुढील चेंडूचा आणि तुम्ही भारतीय संघ, भारतीय खेळाडूंना कसे सामोरे जाता याचा होता," असंही मिकी आर्थर यांनी सांगितलं. 'दिल दिल पाकिस्तान' हे पाकिस्तानमधील प्रसिद्ध गाणं आहे.
बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बाबरने 72 धावांची खेळी केली. अबदुल्ला शफीकच्या 58 धावा, शादाब खानच्या 40 धावा आणि इफ्तिकार अहमदच्या 40 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 282 धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानच्या रेहमनुतुल्ला गुरबाझने 65 धावा आणि इब्राहिम झार्दानने 87 धावा करत उत्तम सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 130 धावांची पार्टनरशीप केली. त्यानंतर रेहमत शाहने नाबाद 77 आणि हशमतुल्ला शाहिदीने नाबाद 48 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानने यानिमित्ताने पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. याआधी 9 दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला आहे.