World Cup 2023 First Nation Knocked Out: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून धक्के खात असलेला इंग्लंडचा संघ हा यंदाच्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नेदरलॅण्ड वर्ल्ड कपमधून आधी बाहेर पडणार अशी शक्यता ही स्पर्धा सुरु होण्याच्या आधी व्यक्त केली जात होती. मात्र पूर्णवेळ सदस्य नसलेल्या या देशानेही यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये प्रभाव पाडणारी कामगिरी केली. असं असतानाच दुसरीकडे वर्ल्ड कपमधील 31 व्या सामन्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ कोण याचं उत्तर मिळालं आहे.
कोलकात्यामधील इडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये पाकिस्तानने विजय मिळवला. पाकिस्तानी संघाचा हा वर्ल्ड कपमधील केवळ तिसरा विजय ठरला आहे. पाकिस्तानने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने या विजयासहीत सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या शर्यतीमधील आपला दावा कायम ठेवला आहे. पाकिस्तानच्या संघाने पैकी 3 सामने जिंकले असून पाकिस्तानी संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. दुसरीकडे बांगलादेशच्या संघाचा हा सहावा पराभव ठरला असून या पराभवासहीत बांगलादेशच्या संघाचं सेमीफायनल्समध्ये पोहचण्याचं स्वप्न भंग पावलं आहे. उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरी बांगलादेशचा संघ सेमीफायनल्समध्ये प्रवेश करु शकत नाही.
बांगलादेशच्या संघाने 45.1 ओव्हरमध्ये 204 धावांपर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानने अवघ्या 32.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात 205 धावा केल्या. बांगलादेशला वर्ल्ड कप 2023 च्या पर्वामध्ये केवळअ अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकता आला आहे. या पराभवाच्या सत्रामुळे बांगलादेशचा संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे.
सध्या पॉइण्ट्स टेबल पाहिला तर इंग्लंडचा संघ तळाशी आहे. मात्र इंग्लंडच्या संघाने बांगलादेशपेक्षा एक सामना कमी खेळला असून इंग्लंडचा संघही पात्र ठरण्याची शक्यता अगदी एक टक्के आहे. मात्र बांगलादेशची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. बांगलादेश आणि इंग्लंड वगळता नेदरलॅण्ड, श्रीलंका, अफगाणिस्तान हे संघ तळाच्या पाच संघांमध्ये आहेत.
अव्वल संघांबद्दल बोलयचं झालं तर 6 पैकी 6 विजय मिळवून भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ 5 विजयांसहीत दुसऱ्या स्थानी असून न्यूझीलंड 4 विजयांसहीत तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियन संघही 4 विजयासहीत चौथ्या क्रमांकावर आहे. नेट रन रेटच्या जोरावर न्यूझीलंड हा ऑस्ट्रेलियापेक्षा सरस आहे.
आज होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडवर विजय मिळवला तर पाकिस्तानची सेमीफायनलमधील दावेदारी कायम राहण्यास मदत होणार आहे.