World Cup : पॉईंट्स टेबलचे खास नियम, सेमीफायनल गाठण्यासाठी प्रत्येक टीमसाठी कसं असेल गणित, पाहा!

World Cup 2023 Points Table: इतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांप्रमाणेच आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही एक पॉईंट्स टेबल असतं. यावेळी टीम्सना पॉईंट्स देण्यासाठी काही नियम असतात. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 5, 2023, 12:17 PM IST
World Cup : पॉईंट्स टेबलचे खास नियम, सेमीफायनल गाठण्यासाठी प्रत्येक टीमसाठी कसं असेल गणित, पाहा! title=

World Cup 2023 Points Table: आजपासून क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरूद्ध इंग्लंड यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. दरम्यान या सामन्याच्या पॉइंट्स टेबलचे नियम कसे असणार आहेत, याची माहिती घेऊया. 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 8 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतासह 10 टीम सहभागी होणार आहेत. जे राऊंड रॉबिन फॉरमॅट अंतर्गत ग्रुप स्टेजमध्ये किमान एकदा एकमेकांना सामोरे येणार आहे. यामधील टॉप-4 टीम उपांत्य फेरीत पोहोचणार आहेत. यामधील विजेते संघ अंतिम फेरीत आमनेसामने येतील.

आईसीसी क्रिकेट वर्ल्डकप प्वॉईंट्स टेबल

इतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांप्रमाणेच आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही एक पॉईंट्स टेबल असतं. यावेळी टीम्सना पॉईंट्स देण्यासाठी काही नियम असतात. यावेळी सामन्यातील विजयी टीमला दोन पॉईंट्स मिळतात, तर पराभूत टीमला एकही गुण मिळत नाही. जर सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळणार आहे. या पॉईंट्स व्यतिरिक्त, टीमना अनेकदा नेट रन नेट (NRR) च्या आधारे क्रमवारी दिली जाते. सामन्यातील प्रत्येक टीमच्या कामगिरीवर नेट रन रेट बनतो किंवा ब्रेक होतो. गुण समान असल्यास, नेट रनरेटच्या दृष्टीने टीमला प्राधान्य दिलं जातं.

सेमीफायनलला कशा पोहोचणार टीम?

आयसीसी वर्ल्डकप 2023 मध्ये यावेळी 10 टीम सहभागी होत आहेत. आयसीसी क्रमवारीच्या आधारे 8 टीम्सना स्थान मिळालंय. क्वालिफायर स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर श्रीलंका आणि नेदरलँड्सच्या टीम्सना वर्ल्डकपची तिकिटं मिळाली आहेत. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीमची विभागणी करण्यात आलेली नाही. यावेळी सर्व टीम्सना एकमेकांविरुद्ध 1-1 सामने खेळायचे आहेत. प्रत्येक टीमला एकूण 9 सामने खेळायचे आहेत. एकूण 45 ग्रुप स्टेज सामने खेळवले जाणार असून 9 पैकी 7 सामने जिंकणाऱ्या टीमला उपांत्य फेरी गाठणं सोपं जाऊ शकतं.

प्रत्येक टीमला त्यांच्या रन रेटकडे लक्ष द्यावं लागणार आहे. पावसामुळे सामना रद्द झाला किंवा गुण आपापसात वाटून घ्यावे लागले, तर ज्या टीमचं नेट रनरेट चांगला असेल तोच संघ पुढे जाईल. कोणतीही टीम जास्तीत जास्त 18 गुण मिळवू शकते. पहिला उपांत्य सामना पॉईंट्स टेबलमधील पहिल्या आणि चौथ्या टीममध्‍ये खेळला जाईल. तर दुसरा उपांत्य सामना पॉइंट टेबलच्‍या दुस-या आणि तिसर्‍या टीममध्‍ये खेळला जाईल.