कोलकाता : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये केलेल्या कामगिरीमुळे ऋषभ पंतनं भारताच्या टेस्ट टीममधलं स्थान भक्कम केलं आहे. याआधी ऋद्धीमान सहा हा भारताचा विकेट कीपर होता, पण दुखापतीमुळे ऋद्धीमान सहाची जागा ऋषभ पंतने घेतली. असं असलं तरी ऋषभ पंतकडून मला धोका नाही, तसंच तो माझा प्रतिस्पर्धी नाही, असं ऋद्धीमान सहाने स्पष्ट केले. मागच्या वर्षी खांद्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ऋद्धीमान सहा भारतीय टीमबाहेर गेला. यानंतर ऋषभ पंतने ही संधी घेऊन इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये चमकदार कामगिरी केली.
दुखापतीनंतर ऋद्धीमान सहा याने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. क्रिकेटपासून एवढा काळ लांब राहिल्यामुळे आणि पंतच्या आगमनामुळे असुरक्षित वाटतं का? असा प्रश्न सहाला विचारण्यात आला, तेव्हा 'मला अजिबात असुरक्षित वाटत नाही. खेळाडूंना नेहमी दुखापतीचा धोका असतो. पूर्णपणे तंदुरुस्त होऊन शानदार पुनरागमन करण्याचं माझं लक्ष होतं,' अशी प्रतिक्रिया सहाने दिली.
'मी दुखापतीमुळे टीमबाहेर होतो. ऋषभ पंतने मिळालेल्या संधीचा फायदा करून घेतला आणि सातत्याने रन केले. आता माझं लक्ष्य फॉर्ममध्ये येऊन भारतीय टीममध्ये पुनरागमन करणं आहे. मी आधीही सांगितलं होतं आणि आताही सांगतो, ऋषभ पंत माझा प्रतिस्पर्धी नाही,' असं वक्तव्य सहाने केलं.
ऋद्धीमान सहाने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या ११ मॅचमध्ये ३०६ रन केले. ऋद्धीमान सहाने आत्तापर्यंत ३२ टेस्ट मॅचमध्ये ३०.६३ च्या सरासरीने १,१६४ रन केले. यामध्ये ३ शतकांचा समावेश आहे. ऋषभ पंतची मजबूत बॅटिंग बघता ऋद्धीमान सहाला आता पुन्हा संधी मिळेल का? याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली होती.