WTC Final 2023 Playing XI: बातमी क्रिकेट विश्वातून. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. विशेष म्हणजे रवी शास्त्री यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांतील खेळाडूंची निवड केली आहे. मात्र, यात टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंनला स्थान दिलेले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. रवी शास्त्री यांची टीम कशी असणार आहे, ते जाणून घ्या.
रवी शास्त्री यांनी रोहित शर्माला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी त्याच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार आणि सलामीवीर म्हणून नियुक्त केले आहे. रवी शास्त्री यांनी रोहित शर्मा याच्या टीमसाठी सलामीचा फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजाची निवड केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मार्नस लबुशेन आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहली याची निवड करण्यात आली आहे.
रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याची फलंदाजीसाठी पाचव्या क्रमांकावर निवड केली आहे. रवी शास्त्री यांनी रवींद्र जडेजा याला त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सहाव्या क्रमांकाच्या आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडले आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरीची 7व्या क्रमांकाची जबाबदारी सोपवली आहे. त्याचवेळी त्याच्यावर यष्टिरक्षणासाठी निवड केली आहे.
रवी शास्त्री यांनी पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि मोहम्मद शमी यांची वेगवान गोलंदाज म्हणून निवड केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू नॅथन लायन याला एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे.
रवी शास्त्री यांनी शुभमन गिल, मोहम्मद सिराज, टॉड मर्फी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, उमेश यादव, ट्रॅव्हिस हेड आणि रविचंद्रन अश्विन या खेळाडूंना आपल्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, रवींद्र जडेजा, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, मोहम्मद शमी.