नवी दिल्ली : भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीलं आहे. चहलनं जनावरांची सुरक्षा आणि त्यांच्यावर होणाऱ्या क्रुरतेवर चहल यानं खंत व्यक्त केली आहे. याआधीही चहलनं सोशल मीडियावरून जनावरांसोबत होणाऱ्या क्रुरतेवर भाष्य केलं आहे. पेटा इंडियानं मला सांगितलं की पशू क्रुरता विरोधी कायदा १९६० नुसार जनावरांसोबत क्रुरता केली आणि त्यांना मारलं तर त्याची शिक्षा फक्त ५० रुपये आहे. सध्या एक कप कॉफीही महाग मिळते, असं चहलनं या पत्रात म्हणलं आहे.
गायी, कुत्रे यांच्यासोबत अनेक जनावरांवर रोज अन्याय होत आहे. त्यांना मारलं जातंय, विष दिलं जातंय, अॅसिड हल्ला केला जातोय. दोषींना योग्य दंड आणि वेळेत जेलमध्ये पाठवलं आणि त्यांचं समुपदेशन केलं तर ते त्यांच्यासाठी आणि जनावरांसाठीही चांगलं असेल. जनावरांशी क्रुरपणे वागणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या. म्हणजे ते पुन्हा असा अपराध करणार नाहीत, अशी मागणी चहलनं या पत्रातून केली आहे.