डॉ. देशमुख... मुंबई विद्यापीठासाठी एवढे कराच!
डॉ. संजय देशमुखांची मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून निवड करण्यात आल्याचे वाचून (सुखद) आश्चर्याचा धक्काच बसला. धक्का अशासाठी की, गेली अनेक वर्षं विद्यापीठाबद्दल चांगलं असं काही वाचनात येतच नव्हतं. २००५-०६ साली जेव्हा मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या एका प्रकल्पात संयोजक म्हणून काम करत होतो, तेव्हा डॉ. देशमुखांनी प्रबोधिनीतील संशोधन संचालकपद सोडून २ वर्षं झाली होती. तरी वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केले. त्यातून निर्माण झालेले मैत्रीचे नाती अगदी आजपर्यंतटिकून आहे. हीच गोष्टं त्यांना ओळखणारे अनेक जणं सांगतील – मग त्यात सुमारे ८-१० वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर सकाळी ८.०८च्या ठाणे फास्ट लोकलने प्रवास करणारा ग्रुप असो...त्यांचे शाळा किंवा कॉलेजमधील मित्र असोत... विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील त्यांचे सहकारी असोत वा ते संलग्न असलेल्या सामाजिक संस्थांमधील कार्यकर्ते असोत. जीवनात आपण जसजशी पुढे वाटचाल करतो तशी मागे घट्ट असलेल्या नात्यांच्या गाठी सैल व्हायला लागतात... आपली इच्छा नसून सुद्धा आपण ते टाळू शकत नाही. पण या नियमाला डॉ. देशमुख अपवाद ठरतात.दरवेळेस जेव्हा मी त्यांना भेटायला जातो, तेव्हा त्यांच्यासोबत १०/२०/३० वर्षांपूर्वी काम केलेली वेगवेगळी लोकं भेटतात आणि एवढी जुनी नाती आजही किती घट्ट आहेत याचा प्रत्यय येतो.
Jun 23, 2015, 04:26 PM IST