डॉ. देशमुख... मुंबई विद्यापीठासाठी एवढे कराच!

 डॉ. संजय देशमुखांची मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून निवड करण्यात आल्याचे वाचून (सुखद) आश्चर्याचा धक्काच बसला. धक्का अशासाठी की, गेली अनेक वर्षं विद्यापीठाबद्दल चांगलं असं काही वाचनात येतच नव्हतं. २००५-०६ साली जेव्हा मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या एका प्रकल्पात संयोजक म्हणून काम करत होतो, तेव्हा डॉ. देशमुखांनी प्रबोधिनीतील संशोधन संचालकपद सोडून २ वर्षं झाली होती. तरी वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केले. त्यातून निर्माण झालेले मैत्रीचे नाती अगदी आजपर्यंतटिकून आहे. हीच गोष्टं त्यांना ओळखणारे अनेक जणं सांगतील – मग त्यात सुमारे ८-१० वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर सकाळी ८.०८च्या ठाणे फास्ट लोकलने प्रवास करणारा ग्रुप असो...त्यांचे शाळा किंवा कॉलेजमधील मित्र असोत... विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील त्यांचे सहकारी असोत वा ते संलग्न असलेल्या सामाजिक संस्थांमधील कार्यकर्ते असोत. जीवनात आपण जसजशी पुढे वाटचाल करतो तशी मागे घट्ट असलेल्या नात्यांच्या गाठी सैल व्हायला लागतात... आपली इच्छा नसून सुद्धा आपण ते टाळू शकत नाही. पण या नियमाला डॉ. देशमुख अपवाद ठरतात.दरवेळेस जेव्हा मी त्यांना भेटायला जातो, तेव्हा त्यांच्यासोबत १०/२०/३० वर्षांपूर्वी काम केलेली वेगवेगळी लोकं भेटतात आणि एवढी जुनी नाती आजही किती घट्ट आहेत याचा प्रत्यय येतो.

Updated: Jun 23, 2015, 04:26 PM IST
डॉ. देशमुख... मुंबई विद्यापीठासाठी एवढे कराच! title=

अनय जोगळेकर : डॉ. संजय देशमुखांची मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून निवड करण्यात आल्याचे वाचून (सुखद) आश्चर्याचा धक्काच बसला. धक्का अशासाठी की, गेली अनेक वर्षं विद्यापीठाबद्दल चांगलं असं काही वाचनात येतच नव्हतं. २००५-०६ साली जेव्हा मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या एका प्रकल्पात संयोजक म्हणून काम करत होतो, तेव्हा डॉ. देशमुखांनी प्रबोधिनीतील संशोधन संचालकपद सोडून २ वर्षं झाली होती. तरी वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केले. त्यातून निर्माण झालेले मैत्रीचे नाती अगदी आजपर्यंतटिकून आहे. हीच गोष्टं त्यांना ओळखणारे अनेक जणं सांगतील – मग त्यात सुमारे ८-१० वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर सकाळी ८.०८च्या ठाणे फास्ट लोकलने प्रवास करणारा ग्रुप असो...त्यांचे शाळा किंवा कॉलेजमधील मित्र असोत... विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील त्यांचे सहकारी असोत वा ते संलग्न असलेल्या सामाजिक संस्थांमधील कार्यकर्ते असोत. जीवनात आपण जसजशी पुढे वाटचाल करतो तशी मागे घट्ट असलेल्या नात्यांच्या गाठी सैल व्हायला लागतात... आपली इच्छा नसून सुद्धा आपण ते टाळू शकत नाही. पण या नियमाला डॉ. देशमुख अपवाद ठरतात.दरवेळेस जेव्हा मी त्यांना भेटायला जातो, तेव्हा त्यांच्यासोबत १०/२०/३० वर्षांपूर्वी काम केलेली वेगवेगळी लोकं भेटतात आणि एवढी जुनी नाती आजही किती घट्ट आहेत याचा प्रत्यय येतो.


मुंबई विद्यापीठ इमारत

त्यामुळेच “मला लोकांचा कुलगुरू बनायचे आहे” असे शीर्षक असलेली त्यांच्या निवडीची बातमी वाचली तेव्हा मला आश्चर्य वाटले नाही. आदल्या रात्री त्यांना अभिनंदनाचा फोन केला असता, विद्यापीठात काय सुधारणा करता येतील अशी त्यांनी माझ्याकडे विचारणा केली. आजवर कधीही.. काहीही शिकवायला न उभा राहिलेला मी काय सूचना करणार? पण मग विचार केला की, एक माजी विद्यार्थी म्हणून तसेच गेली काही वर्षे विद्यापीठाला दिलेल्या भेटींत जाणवलेल्या गोष्टी एका लेखाच्या रुपाने मांडल्यास त्यातील काहींची पूर्तता डॉ. देशमुखांच्या कारकिर्दीत होऊ शकेल.

सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्टं म्हणजे, मुंबई विद्यापीठ विद्यार्थी-स्नेही (फ्रेंडली) होणे गरजेचे आहे. विद्यापीठात प्रवेश असेल, दीक्षांत प्रमाणपत्रं घ्यायचे असेल किंवा अन्य काही कामासाठी दूरवरून आलेल्या विद्यार्थ्यांना साधी झेरॉक्स प्रत काढण्यासाठी किंवा ती प्रमाणित करण्यासाठी जवळपास अर्धा किमी पायपीट करावी लागते. या सुविधा खरंतर महत्त्वाच्या विभागांमध्ये उपलब्ध करून देता येतील. कुठल्याही माहितीसाठी विद्यापीठात फोन केला असता एकतर कोणी फोन उचलतच नाही किंवा मग तो उचलला तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहचत नाही. विद्यार्थ्यांच्या वेळेला आणि उर्जेला किंमत असते.

विद्यापीठाच्या वेबसाईटमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करायला हवे आहेत. सध्याचे वेबसाईट खूप गुंतागुंतीचे आहे. मुखपृष्ठावर अनेक लिंक्स दिसतात पण हवी ती माहिती उपलब्ध नाही असा वारंवार अनुभव येतो. अनेक गोष्टी (टायपिंगचे कष्ट वाचवण्यासाठी) सरळ स्कॅन करून टाकल्या आहेत. विद्यार्थ्यांना हवी असलेली माहिती चटकन डोळ्यांसमोर उपलब्ध होण्याची गरज आहे. आजचे जग सोशल मिडियाचे जग आहे. पंतप्रधान मोदींपासून गल्लीतल्या दुकानांपर्यंत आजकाल सर्वांचाच फेसबुक, ट्विटर आणि यु-ट्यूब वापरतात. खासकरून यु-ट्यूबचा खूप प्रभावीपणे वापर करता येणे शक्य आहे. या माध्यमातून ना केवळ विविध विषयांच्या तासिका तर विद्यार्थ्यांना उपयुक्त गोष्टी जसं की कालिना कॅंपसमध्ये कुठे कोणते विभाग आहेत, विविध विभागात काय काम चालते, प्रवेश घेण्यासाठी, एका विभागातून दुसरीकडे बदलीसाठी, दीक्षांत प्रमाणपत्रं मिळवण्यासाठी इ. काय करावे लागते हे जर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले तर त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना होऊ शकतो. जगाची गोष्टं सोडा... आज देशातील अनेक आयआयटी, आयआयएम तसेच खाजगी विद्यापीठांची चांगल्या दर्जाची यु-ट्यूब चॅनेल आहेत. कॅंपसमध्ये फुकट आणि अतिजलद वाय-फाय सेवा असणेही तितकेच आवश्यक आहे.

विद्यापीठात सर्वाधिक विद्यार्थी वाणिज्य शाखेत शिकतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने हे सहाजिकच आहे. पण माझ्या मते वाणिज्य शाखेचा तंत्रज्ञान आणि व्यवहारज्ञानाशी संबंध तुटला आहे. कॉलेजात शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी इतर २-४ कॉलेजमधील प्राध्यापकांसह लिहिलेली सुमार दर्जाची पुस्तकं वाचून त्या पुस्तकावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायची व्यवस्था आता मोडीत काढायला हवी. आज मुंबईचे आर्थिक हृदय म्हणून ओळखले जाणारे वांद्रे-कुर्ला संकुल विद्यापीठापासून हाकेच्या अंतरावर आहे. देशातील आघाडीचे उद्योगपती मुंबईत रहातात. त्यांच्यापैकी अनेकजण शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी) हे गेली अनेक वर्षं करत आहे. आजकाल जगभरातील विद्यापीठं भारतीय उद्योगपतींनी त्यांच्याकडील संशोधन प्रकल्पांमध्ये तसेच इन्क्युबेटरमध्ये गुंतवणूक करावी यासाठी प्रयत्नशील आहेत. मुंबई विद्यापीठात होणाऱ्या संशोधनाचा दर्जा हा एका संशोधन प्रबंधाचा विषय असला तरी अशा गोष्टींची मुहूर्तमेढ रोवण्याची ही योग्य वेळ आहे.


 

Massive Open Online Courses म्हणजेच “मूक”चा गेल्या काही वर्षांपासून खूप गाजावाजा होत आहे.जगभरातील आघाडीच्या विद्यापीठांतील विविध विषयांचे अभ्यासक्रम इंटरनेटच्या माध्यमातून शिकण्याचे फॅड आता फॅड उरले नसून त्याला प्रउच्च शिक्षणाच्या मुख्य धारेशी कशा प्रकारे जोडता येईल याचा विचार ही विद्यापीठं करायला लागली आहेत. काही विद्यापीठं आपल्याकडील कोर्स ठराविक फी घेऊन इतर विद्यापीठांना देत आहेत. म्हणजे आठवड्यातील काही दिवस/तास वर्गात शिकायचे... काही दिवस/तास इंटरनेटवर शिकायचे आणि दुसऱ्या विद्यापीठाने तयार केलेली परिक्षा स्वतःच्या विद्यापीठात द्यायची. या बदल्यात तुम्ही स्वतःच्या पदवीतील काही क्रेडिट – दुसऱ्या देशात किंवा विद्यापीठात न जाता मिळवू शकता. मुंबई विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या अशा नवीन प्रयोगांना आपलेसे करण्याची आवश्यकता आहे. यामुळे विद्यार्थ्यांना खूप मोठ्या संख्येने जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा स्वतःच्या पदवीमध्येच लाभ घेता येईल.

आंतरशाखीय अभ्यासाची आपल्याकडे फारशी परंपरा नाही. आजच्या इंटरनेट युगात पारंपारिक विद्या शाखा मोडकळीस येत असून तुम्ही एखाद्या प्रश्नाकडे किती वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून बघता यावर तुमचे त्याविषयातील आकलन अवलंबून असते. सायबर सुरक्षा शिकताना फक्त संगणकीय विज्ञान शिकून उपयोग नाही. त्याच बरोबर कायदा, मानसशास्त्र, समाज विज्ञान शास्त्र, न्यूरॉलॉजी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि राजकारण अशा अनेक विषयांचा समावेश होतो. आपल्याकडे कॉलेजमध्ये गेलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांचा दुसऱ्या शाखांतील विषयांशी संबंध तुटून जातो. बीकॉम करणाऱ्या माणसाला इतिहास किंवा संगीत हा अभ्यासाचा विषय म्हणून शिकण्याची सोय हवी. तसेच विद्यापीठात सध्या असलेल्या व्यावसायिक शिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून स्मार्ट शहरं, डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य महाविद्यालयीन तरूणांत निर्माण करणे आवश्यक आहे.

अर्थात या आणि अशा प्रकारच्या सुधारणा करताना सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय भान राखायला हवे. हल्ली साध्यासुध्या व्यवस्थापकीय निर्णयांचे राजकीयकरण केले जाते. त्यात धर्म, जात, प्रांतवाद आणून त्यावर आपली पोळी भाजायचा प्रयत्न राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि मिडियाकडून केला जातो. अचानक मोठ्या प्रमाणात सुधारणा करायला गेल्यास त्याला आतून विरोध होतो. गेल्या काही वर्षांत मुंबई विद्यापीठातून भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाच्या अनेक सुरस रम्य कहाण्या बाहेर आल्या. पण एफटीआयआय आणि आयआयटी मद्रास मधील घटनांवर प्राइम टाइम डिबेट घेणाऱ्या इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी याबाबत कधी काही भूमिका घेतली नाही. या गोष्टी काही लगेचच्या लगेच थांबणं शक्य नाही. पण या गर्तेतून विद्यापीठाला बाहेर काढून त्याला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देणं हे डॉ. देशमुखांसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.