२५०० सीसीची Triumph Rocket 3 R सुपरबाईक लॉन्च

जाणून घ्या Triumph Rocket 3 R बाईकची किंमत 

Updated: Dec 16, 2019, 02:47 PM IST
२५०० सीसीची Triumph Rocket 3 R सुपरबाईक लॉन्च
फोटो सौजन्य : Triumph

अक्षय घुगे, झी मिडिया, मुंबई : भारतीय बाजारात आता ट्रायम्फ कंपनीची रॉकेट-थ्री नावाची एक सुपरबाईक आली आहे. या बाईकला दोन कारच्या ताकदीएवढं इंजिन लावण्यात आलं आहे. अवघ्या काही सेकंदात ही बाईक वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावू लागते. ही बाईक गुळगुळीत हायवेवर आणि ओबडधोबड रस्त्यांवरही चालवू शकता. ओबडधोबड रस्त्यांवर चालवण्यासाठी बाईकमध्ये काही स्पेशल फिचर्स देण्यात आले आहेत. शिवाय टायरमधील हवेच्या दाबाची माहितीही डिस्प्लेवर मिळते. बाईक चालवण्यासाठी चार रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत.

अनेक भारतीयांना रेसिंग बाईकचं वेड असतं. बाईक पाहताना पहिला प्रश्न असतो बाईक किती सीसीची आहे. भारतीय बाजारात फार तर पाचशे सीसीच्या बाईक्स उपलब्ध आहेत. पण आता ज्यांना वेगाचा थरार अनुभवायचा आहे अशा बाईकप्रेमींसाठी ट्रायम्फची रॉकेट-थ्री नावाची बाईक बाजारात आली आहे. 

ब्रिटेनमधील कंपनी ट्रायम्फ मोटरसायकलने भारतात Rocket 3 Bike लॉन्च केली आहे. या बाईकची किंमत जवळपास १८ लाख रुपये इतकी आहे. २०२० ट्रायम्फ रॉकेट ३ बाईक जागतिक पातळीवर ROcket 3 R आणि ROcket 3 GT या दोन वेरिएन्टमध्ये आहे. भारतीय बाजारात सध्या रॉकेट-थ्रीचा आर व्हेरियंट दाखल झाला आहे.

या बाईकचं इंजिन दोन कारच्या क्षमतेएवढं आहे. बाईकमध्ये ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. भारतातील सेदान क्लासच्या कार बाराशे सीसीपर्यंत असतात. रॉकेट-थ्रीचं इंजिन २५०० सीसीचं आहे. बाईकच्या इंजिनचे अनेक पार्ट मजबूत ऍल्युमिनिअमचे आहेत. त्यामुळं पूर्वीच्या ट्रायम्फ बाईकपेक्षा रॉकेट-३  बाईकचं वजन ४० किलोनं कमी झालं आहे.  रॉकेट-थ्रीचा स्टाईल आणि लूक यावर विशेष काम केलंय. त्यामुळं ही बाईक वेगवान आणि ताकदवान झाली आहे.

भारतात बाईकवेडे कमी नाहीत, अडीच हजार सीसीची बाईक ज्या रस्त्यावरुन जाईल तेव्हा लोकांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतील यात शंका नाही.