कोकणात राणेंना ताकद देऊन केसरकरांना डावललं? राजकीय कारकिर्दीचा उतरणीचा काळ?

कोकणात राणेंना ताकद देऊन केसरकर यांना डावललं तर नाही ना, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत  

शिवराज यादव | Updated: Dec 16, 2024, 08:37 PM IST
कोकणात राणेंना ताकद देऊन केसरकरांना डावललं? राजकीय कारकिर्दीचा उतरणीचा काळ? title=

दीपक केसरकर यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात आलं. गेल्या सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलेल्या केसरकरांचा पत्ता कट करण्यात आलाय. तर आमदार नितेश राणे यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे कोकणात राणेंना ताकद देऊन केसरकर यांना डावललं तर नाही ना, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.

राजकारणात कुणाचा तरी उदय कुणाचा तरी अस्त असतो. कोकणात राणे कुटुंबाचा पुनश्चः उदय झालाय. हाच उदय दीपक केसरकरांच्या राजकीय कारकिर्दीचा उतरणीचा काळ असल्याचं सांगण्यात येतंय. दीपक केसरकरांचं मूळ राजकारणच राणे विरोधाच्या पायावर उभं राहिलंय. नारायण राणेंच्या होमग्राऊंडवर राणेंना थेट आव्हान देणारा नेता म्हणून दीपक केसरकरांना कायम बळ दिलं गेलं. मग ती राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या काळात दीपक केसरकरांना गृहराज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. नारायण राणेंचा मधला संघर्षाचा काळ संपलाय. नारायण राणे कोकणचे खासदार झालेत. नितेश राणे राज्य सरकारमध्ये मंत्री आणि निलेश राणे आमदार...कोकण राणेमय होत असताना दीपक केसरकरांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र देण्यात आलाय. त्यामुळं राणेंच्या उदयासह दीपक केसरकरांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागल्याचं सांगण्यात येतंय.

राणे आणि केसरकरांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दीपक केसरकर यांचं संपूर्ण राजकारण राणेविरोधी राहिलेलं आहे. शिवसेनेत असताना केसरकरांनी राजकीय दहशतवाद म्हणत कायमच राणेंना लक्ष्य केलेलं आहे. या वादाची सुरुवात सावंतवाडी नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदापासून सुरू झालेली आहे.

- राणे-केसरकर संघर्ष फार जुना आहे
- 2009 मध्ये पहिल्यांदा दीपक केसरकर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहिले होते
- त्यावेळी शरद पवार यांनी नारायण राणे आणि केसरकर यांचा समेट घडवून आणला होता
- यानंतर केसरकर पहिल्यादा सावंतवाडीतून आमदार म्हणून निवडून आले
- मात्र दोघांमधील वाद कमी होत नव्हता
- राणेंना टार्गेट करणारे केसरकर 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत गेले
- उद्धव ठाकरेंनी राणेंविरोधात केसरकरांना बळ दिलं
-  केसरकर यांना गृहराज्यमंत्रीपद देऊन ठाकरेंनी त्यांची कोकणातली ताकद वाढवली
- 2014 मध्ये शिवसेनेत गेल्यानंतर राणेंच्या विरोधात बोलण्यास केसरकरांना खुल मैदान मिळालं

मात्र राजकारणात कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हणतात. शिंदेंच्या बंडानंतर केसरकर एकनाथ शिंदेंसोबत गेले आणि भाजपसोबत सत्तेत बसले. त्यामुळे राजकीय अपरिहार्यमुळे का होईना राणे आणि केसरकर यांनी जुळवून घेतलं. लोकसभा निवडणुकीत केसरकरांनी नारायण राणेंना मदत केली. तर एकेकाळचे कट्टर विरोधक असलेल्या केसरकरांसाठी नारायण राणेंनी सावंतवाडीत जाहीर सभा घेतली. मात्र आता दीपक केसरकर यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात आलंय. आणि राणेंचे चिरंजीव नितेश राणेंना मंत्रीपद देण्यात आलंय. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणात राणेंचं वर्चस्व प्रस्थापित होताना दिसतंय. यामुळेच दीपक केसरकरांच्या राजकीय कारकीर्दीवरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.