नवी दिल्ली : रिलायन्स जिओ आल्यानंतर टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. काही दिवसांपूर्वी जिओसोबतच एअरटेलही ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्स घेऊन आलीये. जिओच्या फीचर फोनला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता एअरटेलही ग्राहकांसाठी एक फीचर फोन घेऊन येणार आहे.
सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गूगल सोबात एअरटेलने करार केलाय. या करारानुसार दोन कंपन्या स्वस्तात स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. भारती एअरटेलने सांगितले की, त्यांनी स्वस्त अॅन्ड्रॉईड ओरियो स्मार्टफोन भारतीय बाजारात आणण्यासाठी गूगलसोबत हात मिळवलाय. प्रमुख आयटी कंपनी गुगलने गेल्या डिसेंबरमध्ये १ जीबी आणि कमी रॅम असलेला स्मार्टफोनसाठी अॅन्ड्रॉईड ओरियो(गो एडिशन)सादर केला, जे ऑपरेटींग सिस्टम आहे. एअरटेलच्या माहितीनुसार, या करारानुसार मार्चपासून त्यांचा फोन ‘मेरा पहला स्मार्टफोन’ कार्यक्रमांतर्गत विकला जाणार.
लावा आणि मायक्रोमॅक्स कंपनीने आधीच अॅन्ड्रॉईड ओरियो(गो एडिशन) वर आधारित ४जी स्मार्टफोन विकण्याची घोषणा केली आहे. माहिती देण्यात आलीये की, या स्मार्टफोनमध्ये मायएअरटेल, एअरटेल टिव्ही आणि विंक म्युझिक सारखे अॅप असतील. एअरटेलने या कार्यक्रमासाठी अनेक हॅंडसेट कंपन्यांसोबत हातमिळवणी केली आहे.
हॅंडसेट कंपनी लावाने मंगळवारी सांगितले की, त्यांचा अॅन्ड्रॉईड ओरियो(गो एडिशन) असलेला स्मार्टफोन जेड५० पुढील महिन्यात एक लाख विक्री केंद्रांवर असेल. कंपनीने याच्या किंमतीचा खुलासा केला नाही.