New-Gen Maruti Swift Launch Update: नवी कार खरेदी करण्याचा विषय निघाला की, अनेकांचीच पसंती काही ठराविक ब्रँड्सना विशेष पसंती असते. खिशाला परवडणारी, चांगलं मायलेज देणारी, दमदार फिचर्स असणारी आणि नव्या तंत्रज्ञानानं परिपूर्ण असणारी कार खरेदी करण्यासाठी बरीच मंडळी मोठी निरीक्षणं आणि तुलनात्मक अभ्यासही करतात. शेवटी विषय लाखोंमध्ये खर्च केल्या जाणाऱ्या पैशांचा असतो.
कार, हा विषय अनेकांच्याच जिव्हाळ्याचा. त्यातही एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाकडून जेव्हा कार खरेदीचा पर्याय विचारात आणला जातो तेव्हा सर्वप्रथम कारच्या किमतीलाच प्राधान्य दिलं जातं. अशी अनेकांच्या खिशाला परवडणारी, उच्च प्रतीचे फिचर्स असणारी आणि समाधानकारक मायलेज देणारी एक कार म्हणजे मारुती कंपनीची स्विफ्ट.
Maruti या कार उत्पादक कंपनीकडून येत्या काळात Swift कार नव्या रुपात, नवा अंदाजात लाँच केली जाणार असून, कंपनी या मेगालाँचसाठी आता सज्ज झाली आहे. कारचं हे हॅचबॅक मॉडेल एप्रिल महिन्यात लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. डिझाईन मॉडेल, अॅडवांस्ड् फिचर्स आणि मॅकेनिकल अपग्रेड्स अशा गोष्टी या कारमध्ये देण्यात येतील, ज्यामुळं ती कारप्रेमींसाठी एक नवी परवणीच असेल.
प्राथमिक अंदाजानुसार ही कार हार्टेक्ट प्लॅटफॉर्मच्या मॉडिफाइड व्हर्जनच्या आधारे तयार केली जाऊ शकते. ज्यामुळं तिचं वजन तुलनेनं कमी असेल शिवाय या कार निर्मितीमध्ये हाय-स्ट्रेंथ अल्ट्रा-हाई टेंसिल स्टीलचा वापर केला जाईल. नव्या स्विफ्टमध्ये रिडिझाइन्ड फ्रंट ग्रिल, रिवाइज्ड बंपर, एलईडी हेडलँप, अलॉय व्हील्स, इंवर्टेड सी-शेप्ड एलईडी टेललँप असेही फिचर्स देण्यात येतील.
आकारमान म्हणावं तर स्विफ्टचा आकार 15 मिमीनं वाढेल. या कारचं केबिन काहीसं मारुति फ्रोंक्ससारखं असू शकतं. ज्यामध्ये फ्लॅट बॉटम स्टीअरिंग, नवं डॅशबोर्ड, ड्युअल टोन इंटेरिअर थीम असेल. न्यू Z-सीरीज़ 1.2L पेट्रोल इंजिन दिलं जाण्याच्या शक्यता असणारी ही कार 6 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विक्रीसाठी बाजारात आणली जाऊ शकते. थोडक्यात या कार खरेदीचा विचार तुम्ही करुच शकता. आता फक्त एप्रिल महिन्याची वाट पाहायचीये.