'ही' 2 Apps तुमच्याकडेही असतील तर सावधान! Cyber Expert म्हणाले, 'लगेच करा Delete'

Android Apps Infected With Spyware: आपल्यापैकी अनेकांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणते अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्यात आले आहेत याची पूर्ण कल्पना नसते. काही वेळा आपल्या नकळत काही अ‍ॅप्स डाऊनलोड होतात. अशाच दोन अ‍ॅप्सबद्दल आता इशारा देण्यात आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 22, 2023, 05:41 PM IST
'ही' 2 Apps तुमच्याकडेही असतील तर सावधान! Cyber Expert म्हणाले, 'लगेच करा Delete' title=
सायबर सुरक्षातज्ज्ञांनी यासंदर्भात दिला इशारा

Android Apps Infected With Spyware: तुमच्या मोबाईलमध्ये कोणते अ‍ॅप्स आहेत हे तुम्ही वरचेवर तपासून पाहता का? तुम्ही अ‍ॅण्ड्रॉइड फोन (Android Smartphone) वापरत असाल तर वेळोवेळी तुमच्या फोनमध्ये नेमकी कोणती अ‍ॅप्स (Android Apps) इन्स्टॉल केलेली आहेत हे तपासणं फायद्याचं ठरतं. तुमच्या फोनमध्ये चुकून एनशोअर चॅट (nSure Chat) आणि आयकेएचएफएए (iKHfaa) ही दोन अ‍ॅप्स तर इन्स्टॉल झालेली नाही नाही हे तपासून पाहा. कारण ही 2 अ‍ॅप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर लगेच ती डिलीट करा. या अ‍ॅप्समध्ये मालवेअर असल्याचं सायबर सुरक्षा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या मालवेअरच्या माध्यमातून फोनमधील अत्यंत महत्त्वाची माहिती चोरली जात आहे. हे अ‍ॅप्स सायबर हल्ला करण्यासाठीही वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

कोणती माहिती चोरली जाते?

सायबर सुरक्षेशीसंबंधित 'सायफर्मा'ने (CYFIRMA) यासंदर्भातील माहिती दिली आहे. या कंपनीच्या तज्ज्ञांनी युझर्ससाठी हा इशाराच जारी केला आहे. या कंपनीच्या अहवालाप्रमाणे प्ले स्टोअरवर या अ‍ॅप्सच्या डेव्हलपर्सचं नाव सिक्युरीटी इंडस्ट्री (SecirITY Industry) असं आहे. हे अ‍ॅप्स युझर्सच्या मोबाईलमधील संवेदनशील तसेच खासगी माहिती चोरतात. यामध्ये डिव्हाइझ लोकेशन, गॅलरीमधील फोटो, कॉनटॅक्ट लिस्टमधील फोन नंबरसारख्या गोष्टी चोरल्या जातात. सरकारसाठी गुप्त माहिती गोळा करण्याचं काम करणारे हॅकर्सही ही अ‍ॅप्लिकेशन्स वापरतात असंही या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

या धोकादायक ग्रुपशी थेट संबंध

या दोन्ही अ‍ॅप्सचं कनेक्शन अत्यंत घातक अशा डूनॉट (DoNot) या हॅकिंग ग्रुपशी आहे, असं 'सायफर्मा'च्या अहवालामध्ये म्हटलं आहे. या हॅकिंग ग्रुपने यापूर्वी 2018 मध्ये अग्नेय (दक्षिण-पूर्व) आशियामधील अनेक देशांमधील संस्थांवर सायबर हल्ले केले होते. "काही काळापूर्वी या ग्रुपने काश्मीरमधील लोकांना लक्ष्य केलं होतं. पाकिस्तानमधील नागरिकांनाही या ग्रुपने याआधी लक्ष्य केलं आहे. मात्र दक्षिण आशियामध्ये होणाऱ्या या सायबर हल्ल्यांचा हेतू काय आहे हे स्पष्ट झालेलं नाही," असं या अहवालात म्हटल्याचं 'इंडिया टुडे'नं दिलेल्या वृत्तात नमूद केलं आहे.

कशी काळजी घेता येईल?

एनशोअर चॅट (nSure Chat) आणि आयकेएचएफएए (iKHfaa) ही दोन्ही अ‍ॅप्स चुकूनही गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करु नका. जर तुमच्या फोनमध्ये ही अ‍ॅप्स असतील तर तातडीने ती डिलीट करा. गुगलकडूनही वेळोवेळी प्ले स्टोअरवरील अ‍ॅप्समधील धोकादायक अ‍ॅप्स डिलीट केले जातात. मात्र तरीही वेगवेगळ्या नावाने अशी अ‍ॅप्स कार्यरत असतात. त्यामुळे अशी अनोळखी आणि नवख्या कंपन्यांची अ‍ॅप्स डाऊनलोड करताना काळजी घ्यावी. जाहिराती पाहून तर कधीच अशी अ‍ॅप्स डाऊनलोड करु नयेत. कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करताना त्याचे रेटिंग्स तसेच रिव्ह्यू तपासून घ्यावं. अनेकदा रिव्ह्यूमध्येच हे अ‍ॅप खरोखरच उपयोगाचं आहे की नाही याची माहिती मिळते. व्हॉट्सअ‍ॅप, टेलीग्रामवर आलेल्या लिंक्स ओपन करण्यासाठी अनेकदा विचार करा. अशा लिंकवर क्लिक केल्यानंतरही फोन हॅक होण्याचे प्रकार घडतात.

मोबाईलमधील कोणत्या अ‍ॅप्सला लोकेशन, कॅमेरा, गॅलरी, कॉनटॅक्ट्ससंदर्भातील परवानगी दिली आहे ते तपासून पहावे. सार्वजनिक मोफत वायफायच्या मोहात पडू नका. यामुळे खासगी डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते. सार्वजनिक नेटवर्कच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करु नका.