कोरोना काळात स्मार्टफोन वापराच्या पॅटर्नचा रिपोर्ट जारी; जाणून घ्या या रिसर्चबाबत

कोरोना काळात स्मार्टफोनच्या वापरात मोठी वाढ...

Updated: Aug 18, 2020, 09:18 AM IST
कोरोना काळात स्मार्टफोन वापराच्या पॅटर्नचा रिपोर्ट जारी; जाणून घ्या या रिसर्चबाबत title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची बदलती जीवनशैली आणि स्मार्टफोन वापराच्या पॅटर्नबाबत सायबर मीडिया रिसर्च-सीएमआर, टेक्नो मोबाईल आणि मोबाईल कंज्यूमर इनसाइट्स-MICIने एक रिपोर्ट जारी केला आहे. रिपोर्टनुसार, कोरोना काळात स्मार्टफोनचा वापर जवळपास 120 टक्क्यांनी वाढला आहे. 

कोरोनामुळे देशभरात 25 मार्च ते 31 मे दरम्यान, देशव्यापी लॉकडाऊन काळात स्मार्टफोनचा वापर 50 टक्के वाढला. त्यापैकी कामासाठी स्मार्टफोनच्या वापरात 100 टक्के वाढ नोंदवण्यात आली. या कालावधीत 84 टक्के वापरकर्त्यांनी त्यांच्या स्मार्टफोनवर शासकीय योजना, हवामान आणि कृषी उत्पन्न बाजारपेठेशी संबंधित माहिती मिळवली आहे. 83 टक्के लोकांनी ऑनलाईन बँकिंग, शॉपिंग आणि बिल भरण्यासाठी आपल्या फोनचा वापर केला आहे.

त्याशिवाय, स्मार्टफोन वापरकर्त्यांनी व्हिडिओ ओटीटी 70 टक्के, ऑडिओ ओटीटी 60 टक्के आणि गेमिंगचा 62 टक्के वापर केला आहे. तसंच प्रत्येक 7 वापरकर्त्यांपैकी 2 म्हणजेच 29 टक्के लोकांना घरातून काम करताना आव्हानांचा सामना करावा लागला. 

मोबाईल खरेदी करण्याच्या निकषांमध्येही बदल - 

लॉकडाऊन काळात स्मार्टफोनमध्ये 61 टक्के यूजर्स कॅमेरा, 57 टक्के यूजर्स बॅटरी आणि 51 टक्के यूजर्स ऑडिओवर लक्ष देतात. लॉकडाऊनमध्ये 58 टक्के यूजर्सला फोनमध्ये ओव्हरहिटींग, 47 टक्के यूजर्सला छोटी स्क्रिन साईज आणि 46 टक्के यूजर्सला कमी बॅकअप अशा समस्यांचा सामना करावा लागला. आता नवा मोबाईल घेताना 75 टक्के यूजर्स बॅटरी लाईफ बघत असून 53 टक्के यूजर्स मोठी स्क्रिन साईज पसंत करत आहेत.

स्मार्टफोनआरोग्यावर परिणाम तर करत नाही?

लॉकडाऊनमध्ये अनेक लोक इंटरनेट आणि गॅजेट्सवर अवलंबून आहेत. स्मार्टफोनवरच शाळा-कॉलेजमधील वर्ग घेण्यात येत आहेत. अनेक जण गेम खेळण्यात वेळ घालवत आहेत. पण स्मार्टफोनवर अति प्रमाणात अवलंबून असल्याने सायबर धोका भारतासमोर उभा आहे. आता लोकांचा फोन, सोशल मीडिया किंवा बँक अकाऊंट हॅक करणंही सोपं झालं आहे. लोकांमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. 

फोनचा अति वापर आरोग्यावर परिणाम करु शकतो. डोळेदुखी, डोकेदुखी, चक्कर येणं, चिडचिडेपणा, डिप्रेशन आणि बैचन होण्यासारखी लक्षणं फोनच्या अति वापराचा परिणाम असू शकतो. स्पॉन्डिलायटिसच्या आजारात वाढ होत असल्याचं चित्र आहे. 

या काळात सोशल नेटवर्किंग साईट्सवरील वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 22 मार्चच्या आठवड्यापासून, लोकांकडून हेल्थ केअर आणि मेडिटेशन यांसारखी ऍप्स डाऊनलोड केली आहेत. लॉकडाऊननंतर एका आठवड्याच्या आत 39 लाख लोकांनी आपल्या फोनमध्ये अशी ऍप्स डाऊनलोड केली आहेत. डिसेंबर 2019च्या शेवटच्या आठवड्यात भारत व्हिडिओ कंजंक्शनमध्ये 2.1 बिलियन प्रति तास होता, त्यात लॉकडाऊनच्या पहिल्याच आठवड्यात 40 टक्क्यांची वाढ झाली.