मुंबई : जर तुम्ही ऑनलाइन पेमेन्टसाठी 'गुगल पे' अॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 'गुगल पे'ने आपल्या यूजर्ससाठी नवं फिचर लॉन्च केलं आहे. त्यानुसार आता पैसे ट्रान्सफर करताना कोणताही पिन टाकण्याची आवश्यकता नसल्याचं बोललं जात आहे. बोटाचा ठसा किंवा चेहरा दाखवून ट्रान्झक्शन पूर्ण करता येऊ शकतं. 'गुगल पे'ने आपल्या अॅपमध्ये बायोमेट्रिक सेक्युरिटी फीचर (२.१०० वर्जन) जोडलं आहे.
'गुगल पे'ने पेमेन्ट करताना, पैसे ट्रान्सफर करताना पिन टाकावा लागतो. पिन ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यावरच ट्रान्झक्शन पूर्ण होतं. पण आता नव्या फिचरनुसार, यूजर्स जलद, सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने ट्रान्झक्शन करु शकणार आहेत. नव्या फिचरमुळे पैशांचं ट्रान्झक्शन आधीपेक्षा अधिक सुरक्षितरित्या होणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
गुगलने, त्यांच्या डिजिटल पेमेन्ट प्लॅटफॉर्मवर एक नवीन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर जोडलं आहे. गुगलने अॅन्ड्रॉइड १० सह बायोमेट्रिक सिक्युरिटी लॉन्च केली होती. आता हेच फिचर 'गुगल पे'मध्येही जोडण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे.
बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन केवळ पैसे ट्रान्सफर करण्यासाठी देण्यात आलं आहे.
केवळ 'गुगल पिक्सल ४' हा स्मार्टफोन वापरणारे ग्राहकच 'गुगल पे'च्या या नव्या फिचरचा वापर करु शकणार आहेत. 'गुगल'कडून, 'अॅन्ड्रॉइड ९'मध्येही हे फिचर जोडण्याचं बोललं जात आहे. सध्या भारतात हे फिचर उपलब्ध नाही. 'गुगल पे' इंडिया यूजर्स, सध्या UPI पिन ऑथेंटिकेशनद्वारेच ट्रान्झक्शन करु शकणार आहेत.