गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) हे जगभरात अॅप डाऊनलोडसाठी वापरलं जाणारा सर्वात मोठं प्लॅटफॉर्म आहे. प्ले स्टोअरववर तब्बल 3 मिलियन अॅप्स आणि गेम्स डाऊनलोडसाठी उपलब्ध आहेत. पण या प्रसिद्धीसह प्ले स्टोअरसमोर अनेक आव्हानंही उभी राहत आहेत. याचं कारण गुगलच्या नियमांचं उल्लंघन करणारी अनेक अॅप्सही प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत, ज्यांचा सामना करण्यासाठी कंपनी अनेक पद्धतींचा अवलंब करते. हे धोकादायक अॅप्स प्लेस स्टोअरमध्ये घुसखोरी करत त्याच्या माध्यमातून युजर्सच्या मोबाईल फोनपर्यंत पोहोचतात. दरम्यान ताज्या माहितीनुसार, गुगलने एकूण 43 अॅप्सला प्ले स्टोअरवरुन हटवलं आहे. हे अॅप्स चोरुन युजरच्या मोबाईलची बॅटरी वापरत होते.
सर्च इंजिन गुगलने प्ले स्टोअरवरुन 43 अॅप्स काढून टाकले आहेत. हे अॅप्स युजर्सचा मोबाईल बंद असतानाही जाहिराती लोड करत असल्याचं गुगलच्या निदर्शनास आलं होतं. इतकंच नाही, तर आतापर्यंत 2.5 मिलियन वेळा डाऊनलोड करण्यात आलेले हे अॅप्स युजरचा मोबाईल बंद असताना डेटाही खर्च करत होते.
McAfee च्या मोबाईल रिसर्च टीमने सर्वात आधी या अॅप्सची माहिती मिळवली आणि नंतर प्ले स्टोअरच्या नियमांचं उल्लंघन केल्याची माहिती गुगलला दिली. यानंतर अनेक अॅप्स प्ले स्टोअवरुन हटवण्यात आले असून, काही अॅप्सला डेव्हलपर्सने अपडेट केलं आहे. McAfee ने हे अॅप डाऊनलोड करणाऱ्यांना तात्काळ डिलीट करण्याचा सल्ला दिला आहे.
McAfee ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, "अलीकडे;, McAfee च्या मोबाईल रिसर्च टीमने Google Play द्वारे वितरीत केलेल्या काही अॅप्समध्ये चुकीची पद्धत अवलंबली जात असल्याचं पाहिलं. डिव्हाइसची स्क्रीन बंद असताना हे अॅप जाहिराती लोड करतात, जे सुरुवातीला वापरकर्त्यांसाठी सोयीचे वाटू शकतात. तथापि, जाहिराती कशा दाखवल्या गेल्या पाहिजेत यासंबंधीच्या Google Play Developer धोरणाचे हे स्पष्ट उल्लंघन आहे. यामुळे केवळ अदृश्य जाहिरातींसाठी पैसे देणाऱ्या जाहिरातदारांवरच परिणाम होत नाही, तर वापरकर्त्यांवरही परिणाम होतो कारण यामुळे बॅटरी संपते, डेटा वापरला जातो आणि माहिती लीक होणे आणि युजर प्रोफाइलिंगमध्ये व्यत्यय यासारखे संभाव्य धोके निर्माण होतात".
प्ले स्टोअरवरुन काढण्यात आलेल्या या अॅप्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अॅप्स आहेत. यामध्ये TV/DMB प्लेअर्स, म्युझिक डाऊलोडर्स, बातम्या आणि कॅलेंडरर अॅप आहेत. त्यामुळे प्ले स्टोअरमधून तुम्ही कोणते अॅप डाऊनलोड करत आहात यासंबंधी काळजी घेणं गरजेचं आहे.
कोणतेही अॅप इन्स्टॉल करताना विश्वासार्ह डेव्हपर्सचा वापर करा. मोबाईलमध्ये परवानगी देताना व्यवस्थित सर्व तपासा. याशिवाय तुमचा अँड्रॉईड पोन हा सुरक्षेसाठी सतत अपडेट ठेवा. मोबाईलच्या सुरक्षेसाठी सुरक्षा अॅप डाऊनलोड करुन ठेवा.