Guerilla Malware: Android वर मोठा सायबर हल्ला! 89 लाख डिव्हाइसमधील माहिती चोरली

Malware Infects 89 lakh Android Devices: अनेकदा युझर्सला आपल्याकडील डिव्हाइजमध्ये मालवेअर असल्याची कल्पनाही नसते. या मालवेअरच्या माध्यमातून फोटो, खासगी माहिती चोरुन ती डार्क नेटवर उपलब्ध करुन दिली जाते.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 25, 2023, 11:47 AM IST
Guerilla Malware: Android वर मोठा सायबर हल्ला! 89 लाख डिव्हाइसमधील माहिती चोरली title=
Malware Infects 89 lakh Android Devices

Malware Infects 89 lakh Android Devices: मागील काही काळापासून जगभरामध्ये मालवेअरच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सायबर हल्ल्यांचं (Cyber Attack) प्रमाण वाढलं आहे. या सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून अनेक डिव्हाइज हॅक करुन त्यामधील डेटा चोरला जातो. मालवेअर (Malware) इन्फेक्टेड डिव्हाइजमधून मोठ्याप्रमाणात डेटा या हॅकर्सकडे जातो. हा डेटा सामान्यपणे ब्लॅक मार्केटमध्ये (Black Market) किंवा डार्कनेटवर (Dark Net) विकला जातो. या डेटामध्ये फोटो, कॉन्टॅक्ट नंबर, व्हिडीओ, खासगी माहितीचा समावेश असतो. हा डेटा डार्कनेटवरुन उचलून चुकीच्या कामांसाठी वापरला जातो. त्यामुळेच मालवेअर हल्ले रोखण्यासाठी अनेक कंपन्या वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट देण्याबरोबरच अ‍ॅण्टीव्हायरचा उपयोग करण्याचा सल्ला देतात. अशाच एका मोठ्या सायबर हल्ल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा हल्ला लेमन ग्रुप नावाच्या ग्रुपकडून अ‍ॅण्ड्रॉइड युझर्सवर करण्यात आला आहे.

नेमकी काय माहिती समोर आली आहे?

सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जपानमधील 'ट्रेण्ड मायक्रो' नावाच्या कंपनीने यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. समोर आलेल्या अहवालानुसार लेमन ग्रुप नवाची एक सायबर हल्ले करणारा गट आहे. या गटाने जगातील 89 लाखांहून अधिक अ‍ॅण्ड्रॉइड डिव्हाइज 'गोरिला' (Guerilla Malware) नावाच्या मालवेअरने इन्फेक्टेड केले आहेत. हा मालवेअर केवळ मोबाईलमध्ये नाही तर स्मार्टवॉच, टीव्ही आणि इतरही डिव्हाइजमध्ये आहे. या मालवेअरच्या माध्यमातून लोकांची खासगी माहिती चोरली जात आहे. फसवणूक करणारे हे स्कॅमर्स डिव्हाइजमध्ये प्रि-इन्स्टॉल असणारा मलावेअरच्या माध्यमातून चुकीच्या कामांसाठी ही माहिती गोळा करत आहेत. यामध्ये एसएमएसच्या माध्यमातून वन-टाइम पासवर्ड चोरणे, इन्फेक्टेड डिव्हाइजमधून रिव्हर्स प्रॉक्सी सेट करणे आणि व्हॉट्सअप सेशन्स हॅक करण्यासारख्या गोष्टींचा समावेश असल्याचं 'ट्रेण्ड मायक्रो'चा अहवाल सांगतो. 

180 हून अधिक देशांमध्ये पसरला मालवेअर

'ट्रेण्ड मायक्रो'ने एका ब्लॉगमध्ये 'गोरिला' मालवेअर सध्याच्या घडीला जगभरातील लाखो डिव्हाइजमध्ये असल्याचं म्हटलं आहे. या माध्यमातून स्कॅमर्सकडे जगभरातील 180 हून अधिक देशांमधील डिव्हाइजवर नियंत्रण मिळवलं आहे. मालवेअरचा सर्वाधिक फटका बसलेल्या टॉप 10 देशांमध्ये भारताबरोबरच अमेरिका, मॅक्सिको, इंडोनेशिया, थायलंड, रशिया, दक्षिण आफ्रिका, अंगोला, फिलीपिन्स आणि अर्जेंटीना या देशांचा समावेश आहे. 'लेमन ग्रुप'कडून 'गोरिला' मालवेअर कसा पसरवला जात आहे याची ठोस माहिती समोर आलेली नाही. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार अनेक डिव्हाइजमध्ये 'गोरिला' मालवेअर प्रि-इन्स्टॉल म्हणजेच डिव्हाइज खरेदी करण्यापूर्वीच इन्स्टॉल केल्याचं आढळून आलं आहे.

अ‍ॅण्ड्रॉइड डिव्हाइज मालवेअरपासून सुरक्षित कसे ठेवावेत?

> नकली अ‍ॅप्सच्या माध्यमातून अ‍ॅण्ड्रॉइड डिव्हाइजमध्ये मालवेअर पसरतो.

> त्यामुळेच अनोखळी अ‍ॅप्स डाऊनलोड करणं टाळणं हा मालवेअर पसरवण्यापासून रोखण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. 

> गुगल प्ले स्टोअरवरुन अ‍ॅप डाऊनलोड करताना आधी या अ‍ॅपचे रिव्ह्यू वाचून घ्यावेत.

> अ‍ॅपला परमिशन्स देताना आपण कोणत्या गोष्टी अ‍ॅपबरोबर शेअर करतो हे तपासून घ्यावे. आवश्यकतेनुसार म्हणजेच अ‍ॅप वापरता असेल तेव्हाच डेटा अ‍ॅक्सेस करण्यास परवानगी द्यावी.

> आपल्या डिव्हाइजमधील सॉफ्टवेअर अपडेट ठेवावेत. अनेकदा वेळोवेळी या अ‍ॅप्सचे अपडेट्स उपलब्ध करुन दिले जातात. अ‍ॅप अपडेट टाळू नये.

> अॅण्टीव्हायरस वापरणे हा सुद्धा मालवेअरविरुद्ध लढण्यासाठी उत्तम मार्ग आहे.