Bike वरचं 'हे' एक बटण मायलेजचे बारा वाजवेल; ते बिघडलं असल्यास आताच दुरुस्त करा

Bike News : बाईक चालवताय? तुम्हाला त्याबाबतचे सर्व बारकावे ठाऊक असायलाच हवेत. नाहीतर एका क्षणात महागातली बाईकही होईल निकामी. भविष्यात पश्चाताप नकोय? आताच चुका दुरुस्त करा.   

Updated: May 24, 2023, 01:28 PM IST
Bike वरचं 'हे' एक बटण मायलेजचे बारा वाजवेल; ते बिघडलं असल्यास आताच दुरुस्त करा title=
bikes mileage functions and details auto news

Bike News : गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. वाहतूक कोंडीची समस्या पाहता रस्त्यावर चारचाकी घेऊन बाहेर पडण्याऐवजी दुचाकीनं प्रवास करण्याला अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. त्यामुळं हल्लीच्या दिवसांमध्ये विविध कंपन्यांच्या दुचाकीबाबतही बरीच माहिती हे बाईकप्रेमी ठेवताना दिसतात. 

अफलातून फिचर्स आणि त्याहीपेक्षा खिशाला परवडणाऱ्या दरात विविध कंपन्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत दुचाकी वाहनं तयार करतात. यामध्ये प्रत्येक कंपनीच्या दुचाकीच्या मॉडेलचं अमुक एक वैशिष्ट्य असतं. यामध्ये सर्वाधिक काळजीचा मुद्दा असतो, तो म्हणजे बाईक अर्थात दुचाकीच्या मायलेजचा.  

आपण घेत असणारी किंवा खरेदी केलेली बाईक किती लीटर पेट्रोलमध्ये किती अंतरापर्यंत नेते हे सर्वात महत्त्वाचं समीकरण. बरं, त्यातही बाईक पॉवर किती जनरेट करते याचीही अनेकांनाच काळजी. अशा परिस्थितीत बाईकचं मायलेज कोणकोणत्या मार्गांनी वाढेल यावर आपण जितकं लक्ष देतो तितकंच लक्ष कोणत्या घटकांमुळे मायलेज बिघडतं याकडेही दिलं जाणं महत्त्वाचं आहे. 

तुम्हाला हे माहितीये का? 

प्रत्येक बाईकमध्ये एक लीवर असतं. थोडक्यात एक असं बटण असतं जे फिरवल्यास बाईकचा मायलेज कमी होतो. हे लीवर म्हणजे बाईकचा चोक. थंडीच्या दिवसांमध्ये बाईकचं इंजिन सुरु करण्यासाठी या चोकचा वापर केला जातो. पण याचा नेमका वापर तुम्हाला माहितीये? 

कुठे असतो हा चोक? 

बऱ्याच जुन्या बाईक्समध्ये हँडल बारमध्ये चोक असतो. तर, काही दुचाकींमध्ये इंधनाच्या टाकीच्या बरोबर खाली चोक असतो. 

हेसुद्धा वाचा : BMW चं फुलफॉर्म माहितीये? एका श्वासात बोलताना बोबडीच वळेल 

अनेकदा चोकचा नॉब खुला ठेवल्यानंतर तो परत बंद करण्याचं बरेचजण विसरून जातात. सहसा जुन्या मॉडेलच्या बाईकमध्ये ही समस्या अधिक असते. जिथं चोक खुला राहिल्यामुळं बाईकला वाजवीहून जास्त पेट्रोल / इंधनाची गरज लागते. कारण, बाईक सुरु न झाल्यास याच चोकच्या मदतीनं इंजिनपर्यंत जास्त इंधन पाठवून ती सुरु करता येते. 

चोकचं बटण दाबल्यास त्यामुळं कार्बोरेटरला होणारा हवेचा पुरवठा बंदं होतो आणि इंजिन जास्त पेट्रोल खेचतं. ज्यानंतर इग्निशनसाठी चांगल्या पद्धतीनं इंधन मिळतं आणि बाईक सुरु होते. पण, चोकचा वापर केल्यानंतर तो लगेचच बंदही करणं महत्त्वाचं आहे. अन्यथा सातत्यानं इंधनाचा पुरवठा सुरु राहतो आणि अजाणतेपणानं बाईकचं मायलेज कमी होतं.