Pan Card Apply: पॅनकार्ड एक महत्त्वाच्या कादपत्रांपैकी आहे. सरकारी कामांसाठी ओळखपत्राचा पुरावा म्हणून पॅनकार्ड दिले जाते. तर, इनकम टॅक्स भरण्यासाठीही पॅनकार्डची गरज पडते. पॅनकार्ड नसल्यास इन्कम टॅक्स भरण्यास अडचणी येतात. याशिवाय आर्थिक देवाण-घेवाण करण्यासही पॅन कार्डचा वापर केला जातो. पण जर तुमच्या पॅन कार्डला 10 किंवा 20 वर्षे उलटून गेली असतील तर अशावेळी नवीन पॅनकार्ड घ्यावे का? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? जाणून घेऊया अशावेळी नेमकं काय करावं.
पॅनकार्ड हे महत्त्वाचे दस्तावेज आहे. पॅनकार्ड काढून 10 किंवा 20 वर्षे लोटली असतील तर पॅनकार्ड थोडे खराब होते. त्यावरील अक्षरे पुसट होतात. पॅनकार्डवरील नंबर हा खूप महत्त्वाचा असतो. पण जुने झाल्यामुळं नंबरही अस्पष्ट दिसतो. अशावेळी पॅन कार्डची झेरॉक्स काढायला गेले तरीदेखील कॉपी नीट येत नाही. त्यामुळं सरकारी कामांच्यावेळी अडचण निर्माण येऊ शकते. तसंच, पॅनकार्ड खुप जुने झाले असेल तर नवीन पॅनकार्ड काढावे लागते का? कायदा काय सांगतो. जाणून घ्या.
कर आणि कायदे तज्ज्ञांनी जुन्या पॅनकार्डसंबंधीत काही नियम सांगितले आहेत. तज्ज्ञांनुसार, जुने पॅनकार्ड बदलण्याची गरज नाहीये. कारण पॅनकार्ड करदात्याच्या आयुष्यभरासाठी वैध राहते. जोपर्यंत पॅनकार्ड सरेंडर केले जात नाही तोपर्यंत ते तुमच्या नावाने वैध राहते. त्याचबरोबर जुने व खराब झालेले पॅनकार्ड बदलण्याची काहीएक गरज नाहीये. कारण पॅनकार्डचा मुख्य उद्देष हा टॅक्ससाठी आहे. पण अनेकदा ओळखपत्र म्हणूनही त्याचा वापर केला जातो. म्हणूनच तुमची गैरसोय होऊ नये म्हणून पॅनकार्डवर लिहलेली माहिती स्पष्ट असणे गरजेचे आहे जेणेकरुन ओळखपत्राची पडताळणी होईल.
NSDL पॅन पोर्टलवरुन तुम्ही इलेक्ट्रॉनिक पॅनची एक प्रत प्राप्त करु शकता. तसंच, त्या पोर्टलवरुन तुम्ही पॅनकार्डची एक फिजिकल कॉपीसाठीही अप्लाय करु शकता. खराब झालेले पॅनकार्ड बदलणे बंधनकारक नाही कारण पॅन कार्ड आयुष्यभर वैध असतात. नागरिकांची इच्छा असल्यास, ते आयकर विभागाच्या अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष अर्ज सबमिट करून डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात.