सोशल मीडियावरील चुकीच्या संदेशापासून सावधान, अन्यथा गुन्हा !

 मुंबई आणि पुणे या दोन शहरांबाबत चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही अशी संदेशापासून सावध राहा.

Updated: May 29, 2020, 06:54 AM IST
सोशल मीडियावरील चुकीच्या संदेशापासून सावधान, अन्यथा गुन्हा !
प्रतिकात्मक छाया

मुंबई : एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे सोशल मीडियाच्यामाध्यमातून चुकीचे संदेश व्हायरल होत आहे. त्यामुळे लोकांनी घाबरुन जाऊ नये. या सगळ्या अफवा आहेत. लॉकडाऊन ३१ मेपर्यंत आहे. पुढील लॉकडाऊनबाबत निर्णय झालेला नाही. असे असताना सोशल मीडियावर चुकीचे संदेश फिरविण्यात येत आहेत. मुंबई आणि पुणे या दोन शहरांबाबत चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही अशी संदेशापासून सावध राहा, असे आवाहन शासनाकडून करताना अधिकृत प्रसारित माहितीची नोंद घ्यावी, असे विशेष राज्य पोलीस महानिरीक्षक म्हटले आहे.

याआधी काही अफवा पसरविण्यात येत असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. आता पुन्हा चुकीचे संदेश सोशल मीडियाच्यामाध्यमातून फिरविण्यात येत आहेत. सध्या लॉकडाऊनच्या काळात २७ मे २०२० पासून सर्व सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे की, "मुंबई व पुणे शहरांमध्ये कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि लॉकडाऊनच्या नियमांचे कडक शिस्तीने पालन करण्याच्या हेतूने या दोन शहरांमध्ये लष्कराला पाचारण करण्यात येणार आहे. तसेच या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मर्यादित काळापुरती चालू राहतील, असा संदेश फिरत आहे.

कृपया चुकीच्या आशयाचा मजकूर असणाऱ्या कोणत्याही मेसजवर विश्वास ठेवू नये तसेच हा मेसेज फॉरवर्ड देखील करु नये. त्यातील मजकूर हा खोटा असून या शहरांमध्ये लष्कराला पाचारण करण्यात येणार नाही. महाराष्ट्र सायबरतर्फे सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की, सर्व नागरिकांनी शासनाकडून अधिकृतपणे प्रसारित केलेल्या माहितीची नोंद घ्यावी. तसेच कोणत्याही माहितीची खातरजमा न करता व त्याची सत्यता न पडताळता मेसेज फॉरवर्ड करणे किंवा चुकीची माहिती व अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे.  

असे खोटे मेसेज पाठविणाऱ्यांविरुद्ध पोलीस कडक कायदेशीर कारवाई करतील. अशी कृती करणे हा एक सामाजिक गुन्हा देखील आहे. अशा प्रकारचे मेसेज पाठविणाऱ्या व्यक्ती आपली समाजातील विश्वासाहर्ता गमावून बसतील आणि त्यांनी एखादी खरी माहिती पाठविली तरी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला जाणार नाही. विशेष करुन जे व्हाट्सॲप ग्रुप्सचे अॅडमिन्स किंवा ग्रुप निर्माता आहेत त्यांनी, आपल्या ग्रुपवर अशा आशयाचे मेसेज येणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.