'ही' असणार Marutiची पहिली इलेक्ट्रिक कार, पाहा कधी होणार लॉन्च

पेट्रोल-डिझेलची सतत होणारी दरवाढी आणि प्रदुषण यामुळे सरकारसोबतच कार निर्माता कंपन्यांनीही एक महत्वपूर्ण पाऊल उचलत इलेक्ट्रिक कार बनवण्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत

Updated: Jun 7, 2018, 08:52 AM IST
'ही' असणार Marutiची पहिली इलेक्ट्रिक कार, पाहा कधी होणार लॉन्च
File Photo

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलची सतत होणारी दरवाढी आणि प्रदुषण यामुळे सरकारसोबतच कार निर्माता कंपन्यांनीही एक महत्वपूर्ण पाऊल उचलत इलेक्ट्रिक कार बनवण्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. याचीच एक झलक ऑटो एक्सपो 2018 मध्ये पहायला मिळाली. या ऑटो एक्सपोमध्ये अनेक कंपन्यांनी बाईकपासून कार पर्यंत इलेक्ट्रॉनिक व्हेरिएंट सादर केले. याच दरम्यान देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुतीनेही आपली इलेक्ट्रिक कार फ्यूचर एस (Future S)चं कॉन्सेप्ट मॉडल सादर केलं.

मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार

मिळालेल्या माहितीनुसार, मारुती कंपनी सर्वातआधी आपली प्रसिद्ध हेचबॅक कार वॅगनआरचं इलेक्ट्रिक व्हेरिएंट बाजारात लॉन्च करणार आहे. म्हणेजच मारुती कंपनीची वॅगनआर ही पहिली इलेक्ट्रिक कार असणार आहे.

गुजरातमध्ये प्लान्ट तयार

वॅगनआर इलेक्ट्रिकला कंपनीतर्फे 2020 मध्ये लॉन्च करण्याची योजना सुरु आहे. बिझनेस लाईनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मारुती वॅगनआरच्या इलेक्ट्रिक व्हेरिएंटला टोयोटासोबत मिळून तयार केलं जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते, WagonR EV ला कंपनी 2020 मध्ये बाजारात लॉन्च करेल. कंपनीतर्फे ही कार गुजरातमध्ये असलेल्या प्लान्टमध्ये तयार करणार असल्याचं बोललं जात आहे. या कारची बॅटरी टोयोटा कंपनीसोबत मिळून तयार केली जात आहे.

दोन कंपन्यांची तयारी 

इलेक्ट्रिक वॅगनआर ही पहिली कार असणार आहे जी तयार करण्यासाठी दोन कंपन्या मिळून काम करत आहेत. टोयोटातर्फे यापूर्वीच घोषणा केली होती की, सुजुकी अलट्राहायफिशिएंसी पावर ट्रेन तयार करण्यासाठी मदत करणार. मारुती नेक्स्ट जनरेशन वॅगनआर भारतीय बाजारात या वर्षाच्या अखेरपर्यंत लॉन्च करण्याची योजना आहे. इलेक्ट्रिक कारचं वजन हे सध्याच्या वॅगनआर पेक्षा कमी असणार आहे.

20 लाखांहून अधिक वॅगनआरची विक्री

इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये नेमक्या काय-काय सुविधा देण्यात येणार आहेत यासंदर्भात मारुती कंपनीतर्फे अद्याप निर्णय घेतलेला नाहीये. वॅगनआरच्या स्टँडर्ड मॉडलला कंपनीच्या हरियाणामधील गुरुग्राम प्लान्टमध्ये तयार केलं जातं. मारुती कंपनीच्या अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे की, इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्येही सध्याच्या वॅगनआर सारख्याच सुविधा असतील. बाजारात आतापर्यंत वॅगनआरचं मॅन्युअल आणि ऑटो गिअर व्हेरिएंटच्या 20 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.