मुंबई : मारुतीची एसयूव्ही व्हिटारा ब्रिझाला भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. एसयूव्ही आवडणारे मारुतीच्या या गाडीला पसंती देत आहेत. भारतातल्या यशस्वी एसयूव्हीमध्ये व्हिटारा ब्रिझाचं नाव घेतलं जातंय. डिसेंबर २०१७मध्ये व्हिटारा ब्रिझाच्या २ लाख मॉडेल्सची विक्री झाली होती.
व्हिटारा ब्रिझाच्या या यशानंतर आता कंपनी याच एसयूव्हीचं पेट्रोल व्हेरियंटही बाजारात आणणार असल्याचं बोललं जात आहे. ऑटो एक्सपो २०१८मध्ये मारुती व्हिटारा एक्सपोचं पेट्रोल व्हेरियंट लॉन्च करण्यात येईल, अशी माहिती मिळतेय.
ऑटो एक्सपोमध्ये व्हिटारा ब्रिझाचं पेट्रोल व्हेरियंट लॉन्च होईल अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. तरी कंपनीनं मात्र याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
सध्या बाजारात मिळत असलेल्या व्हिटारा ब्रिझाच्या डिझेल मॉडेलला १२४८सीसीचं DDis इंजिन आहे. ही गाडी २४.३ किमी प्रती लिटर मायलेज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
पेट्रोल इंजिनामध्ये मारुती १.५ लीटरचं इंजिन देऊ शकते. हे इंजिन कारला १०० बीएचपीची ताकद देईल. या एसयूव्हीला ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्ससोबत लॉन्च करण्यात येऊ शकतं.
व्हिटारा ब्रिझा सध्या ६ रंगांमध्ये उपलब्ध आहे. या गाडीमध्ये टर्न इंडिकेटर, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, स्मार्टप्ले इंफोटनमेंट सिस्टिम, कूल्ड ग्लव बॉक्स, क्रुज कंट्रोल, प्रोजेक्टर हेडलॅम्प इत्यादी फिचर्स देण्यात आलेत. भारतीय बाजारामध्ये ब्रिझाचं पेट्रोल मॉडेल डिझेल मॉडेलपेक्षा स्वस्त असेल. डिझेल मॉडेलची किंमत ७.२८ लाख रुपयांपासून सुरु होते.