नवी दिल्ली : देशात रस्ते अपघाताचं प्रमाण सर्वाधिक असून बेदरकारपणे गाडी चालवणं, खराब रस्ते यामुळे अपघातात मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे. वेळोवेळी आवाहन करुनही अनेक वाहनचालक याकडे दुर्लक्ष करतात. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Niting Gadkari) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
कारमध्ये 6 एअरबॅग्स अनिवार्य होणार
वाहनं सुरक्षित करण्यासाठी सरकार लवकरच सर्व वाहनांमध्ये 6 एअरबॅग्स अनिवार्य (6 Airbags Mandatory0 करण्याचा आदेश देऊ शकतं. मध्यमवर्गीय लोकांकडून लहान कार खरेदी केल्या जातात. यात साधारण दोन एअरबॅग्स असतात. ऑटोमेकर्स फक्त मोठ्या आणि महागड्या कारमध्येच जास्त एअरबॅग देतात. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लहान आणि स्वस्त कारमध्येही सहा एअरबॅग्स देण्याचं आवाहन कार उत्पादक कंपन्यांना केलं आहे.
भारतीय ग्राहकांची सर्वाधिक पसंती ही त्यांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या कारला असते. या वाहनांमध्ये 6 एअरबॅग दिल्या गेल्या तर त्यांच्या किमती नक्कीच वाढतील. दोनपेक्षा जास्त एअरबॅगच्या संख्येत वाढ झाल्यामुळे किमतीत 8 ते 9 हजार रुपयांचा फरक पडणार आहे.
सर्व वाहनांसोबत 6 एअरबॅग असणं आवश्यक
प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सर्व वाहनांमध्ये 6 एअरबॅग देणं अत्यंत आवश्यक असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. तेव्हाही त्यांनी सर्व कारच्या सर्व प्रकारांमध्ये किमान 6 एअरबॅग देण्याबाबत सांगितलं होतं.