भारतात एप्रिल महिन्यात एकाही कारची विक्री नाही

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार...

Updated: Apr 27, 2020, 12:13 PM IST
भारतात एप्रिल महिन्यात एकाही कारची विक्री नाही  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचं संकट आणि त्यामुळे असणाऱ्या लॉकडाऊनमुळे एप्रिल महिना कार उत्पादन कंपन्यांसाठी सर्वात वाईट महिना ठरु शकतो. या संपूर्ण एप्रिल महिन्यात भारतात एकाही नव्या कारची विक्री झालेली नाही. हा तोटा आता कसा भरुन काढायचा, या तोट्यातून वर कसं यायचं ही चिंता सध्या कार कंपन्यांपुढे उभी आहे.

स्कोडा कार निर्माता कंपनीचे प्रमुख जॅक हॉलिस यांनी ट्विट करत, एप्रिल महिन्यात त्यांच्या एकाही कारची विक्री झाली नसल्याचं सांगितलं. हीच परिस्थिती इतर कार कंपन्यांचीदेखील आहे. मारुती सुझुकी आणि हुंदाई यांसारख्या कंपन्यांची शोरुम बंद आहेत. टाटा कंपनीने आपल्या कार ऑनलाईन विक्री करण्याचा अनोखा उपाय शोधला आहे. पण तरीदेखील बाजारात सध्या यात यश मिळत नसल्याचं चित्र आहे.

गेल्या महिन्यातही कार कंपन्यांच्या विक्रीत मोठी घसरण -

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यातही कारची विक्री अतिशय कमी झाली होती. मारुती, हुंदाई या मोठ्या कार कंपन्यांनी विक्रीत 46 टक्क्यांपर्यंत मोठ्या घसरणीची नोंद केली.

मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी सांगितलं की, एप्रिल महिन्यात विक्रीमध्ये मोठी घसरण होणार आहे. एप्रिलमध्ये काही असामान्य गोष्टी झाल्याचंही त्यांनी सांगितलं. एखाद्या महिन्यात एकाही कारची विक्री झाली नाही, असं यापूर्वी कधीही झालं नाही. एप्रिल हा अशाप्रकारचा पहिलाच महिना असेल असं ते म्हणाले.

 

जानेवारी महिन्यापासूनच कोरोना व्हायरसच्या वाढत्या चर्चांमुळे कारची विक्री कमी होत होती. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कार कंपन्यांना कारची विक्री करण्यासाठी मोठ्या समस्येचा सामना करावा लागला होता. आता लॉकडाऊन संपल्यानंतरच या क्षेत्रात काही समाधानकारक हालचाली होण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.