OLA चा धुमाकूळ! एका महिन्यात 35 हजाराहून अधिक स्कूटर्सची विक्री; मोडला आपलाच रेकॉर्ड

OLA ने गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटर्सची रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे. यासह OLA सलग नवव्या महिन्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकी (Electric Scooter) विकणारी कंपनी ठरली आहे. विशेष म्हणजे, FAME-II अनुदानात घट केल्यानंतर इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमतीत वाढ झाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 3, 2023, 11:56 AM IST
OLA चा धुमाकूळ! एका महिन्यात 35 हजाराहून अधिक स्कूटर्सची विक्री; मोडला आपलाच रेकॉर्ड title=

OLA Electric पुन्हा एकदा देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकी विक्री करणारी कंपनी ठरली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने दुचाकींच्या विक्रीत आपलाच रेकॉर्ड मोडला आहे. OLA Electric ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने मे महिन्यात 35 हजाराहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली आहे. बंगळुरुमधील या स्टार्टअपने फार कमी महिन्यात इतकं मोठं यश मिळवलं आहे. यासह इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये कंपनीच्या मार्केटचा शेअर 30 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तसंच OLA ने सलग नवव्यांदा सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री करण्याचा रेकॉर्ड केला आहे.

OLA Electric ने एप्रिल महिन्यात 30 हजारांहून अधिक दुचाकींची विक्री केली आहे. प्रत्येकवर्षी कंपनीच्या आकडेवारी तब्बल 300 टक्क्यांनी वाढ होत आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितलं आहे की "सरकारी निधीत घट झाल्याने आम्ही दुचाकींच्या किंमतीत थोडीशी वाढ केली आहे. दरम्यान, देशात इलेक्ट्रिक दुचाकींना पाठबळ देण्याची ओलाची मोहिम कायम राहणार आहे".

OLA ने इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमतीत किती वाढ केली?

केंद्र सरकारने 1 जूनपासून FAME-II अनुदानात घट केली आहे. यामुळे फक्त OLA नव्हे तर सर्वच कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमतीत वाढ केली आहे. दरम्यान, यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी महाग झाल्या आहेत. OLA च्या किंमतीतही वाढ झाली असून 4 kWh बॅटरी पॅक असणाऱ्या S1 Pro ची किंमत 1 लाख 39 हजार 999 रुपये इतकी झाली आहे. तर 3 kWh बॅटरी पॅक असणाऱ्या S1 ची किंमत 1 लाख 29 हजार 999 रुपये झाली आहे. आणि 3 kWh ली-आरर्न बॅटरी पॅकसह येणाऱ्या S1 Air साठी 1 लाख 9 हजार 999 रुपये मोजावे लागत आहेत. 

S1 आणि S1 Air ला स्टँटर्ड 3 kWH क्षमतेच्या बॅटरी पॅकसह सादर केलं जातं. तर S1 Pro ला 4 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, S1 Pro स्कूटर सिंगल चार्जमध्ये 181 किमी IDC रेंजसह येते. तर S1 आणि S1 Air अनुक्रमे 141 किमी आणि 125 किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते. 

1 जूनपासून इलेक्ट्रिक दुचाकी महाग

1 जूनपासून देशात इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणं महाग झालं आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने 21 मे रोजी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, इलेक्ट्रिक दुचाकीवरील अनुदान कमी केलं आहे. यापूर्वी ही सबसिडी 15 हजार रुपये प्रति किलोवॅट होती, ती कमी करून 10 हजार रुपये प्रति किलोवॅट तास करण्यात आली आहे. यामुळे जूनपासून इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्यासाठी 25 ते 30 हजार जास्त रुपये मोजावे लागत आहेत.