मुंबई : तुमचे मोबाईलवरील बोलणे महाग होण्याची शक्यता आहे. देशातील खासगी क्षेत्रातील प्रमुख तीन टेलिकॉम ऑपरेटर (telecom operator) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपासून पुन्हा एकदा टॅरिफ योजना वाढवू शकतात. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात या कंपन्यांचे उत्पन्न 20-25 टक्क्यांनी वाढू शकते, असेही सांगण्यात आले आहे.
देशांतर्गत रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या संशोधन शाखेच्या अहवालात म्हटले आहे की, उद्योगांना नेटवर्क आणि स्पेक्ट्रममध्ये गुंतवणूक करण्यासाठी, प्रति यूजर्समागे सरासरी महसूल वाढवणे आवश्यक आहे. त्यांनी असे न केल्यास सेवेचा दर्जा खालावू शकतो. रिलायन्स जिओच्या आगमनाने सुरु झालेल्या तीव्र स्पर्धेनंतर डिसेंबर 2019 पासून उद्योगाने दर वाढवण्यास सुरुवात केली.
अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात प्रमुख तीन कंपन्यांच्या महसुलात 20-25 टक्क्यांनी मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, मंद वाढीनंतर 2021-22 मध्ये प्रति यूजर्स सरासरी महसूलामध्ये (ARPU) पाच टक्के होता, तो आता 2022-23 मध्ये 15-20 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.