Royal Enfield Classic 350 Price and Freatures : मागील काही वर्षांमध्ये भारतात स्पोर्ट्स बाईकचा ट्रेंड वाढताना दिसला. असं असलं तरीही बाईकप्रेमींध्ये एक वर्ग असाही आहे, ज्यानं रॉयल एनफिल्ड या ब्रँडची साथ सोडलेली नाही. थोडक्यात क्रूजर बाईकला पसंती देणाऱ्यांचा आकडाही भारतात मोठा आहे. अशा या बाईकच्या श्रेणीत आता एनफिल्डकडून एक नवी बाईक किंबहुना एक लोकप्रिय बाईक नव्या अंदाजात सादर करण्यात आली आहे. बऱ्याच काळानंतर RE नं त्यांच्या रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाईकला काही अपडेट्सह सादर केलं आहे.
नवे ग्राफिक्स, नवे रंग आणि अद्ययावर फिचरची जोड एनफिल्ड क्लासिक 350 च्या या नव्या मॉडेलला देण्यात आली आहे. कंपनीकडून या बाईकच्या लूकचं अनावरण झालं असलं तरीही तिच्या नव्या दरांबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अधिकृत वृत्तानुसार 1 सप्टेंबरपासून ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध असेल आणि तेव्हाच तिच्या किंमतीचीही घोषणा करण्यात येईल. लाँच केल्यानंतर लगेचच या बाईकसाठीची बुकिंगही सुरू होणार आहे.
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ही बाईक पाच नव्या वेरिएंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहणार असून, त्यामध्ये हेरिटेज, हेरिटेज प्रिमियम, सिग्नल, डार्क आणि एमराल्ड अशा व्हेरिएंटचा समावेश आहे. एकूण 7 रंगांमध्ये उपलब्ध असणारी ही बाईक अनेकांचीच नजर रोखणार यात वाद नाही.
बाईकच्या हेरिटेज व्हेरिएंटमध्ये दोन रंग उपलब्ध असून, मद्रास रेड आणि जोधपूर ब्लू अशा छटा असतील तर, हेरिटेज प्रिमियममध्ये मेडेलियम ब्रॉन्झ या रंगाचा पर्याय असेल. सिग्नल व्हेरिएंड कमांडो सँड शेडमध्ये उपलब्ध असेल. डार्क व्हेरिएंट गन ग्रे आणि स्टील्थ ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध असेल. बाईकचं टॉप स्पेक मॉडेल एमराल्डमध्ये क्रोम आणि कॉपर पिनस्ट्रीपसह रिगल ग्रीन शेडमध्ये उपलब्ध असेल.
349 सीसीचं सिंगल सिलिंडर J सीरिज इंजिन या बाईकमध्ये देण्यात आलं असून, त्यातून 20.2 hp पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट होईल. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे. बाईकचा लूक फार बदललेला नसला तरीही कंपनीनं त्याचा रेट्रो लूक अधिक उठावदार केला आहे. मडगार्ड, मेटल फ्यूल टँक, एलईडी लायटिंग, टेल लाईट, गियर पोझिशन इंडिकेटर, स्मार्टफोन चार्जिंगसाठी यएसबी सी टाईप चार्जिंग पोर्ट असे पर्याय या बाईकमध्ये देण्यात आले आहेत.
नव्या तंत्रज्ञानाशी सांगड घालत या बाईकचं अपडेटेड वर्जन सादर करण्यात आलं असून, सध्याच्या मॉडेलपेक्षा या नव्या मॉडेलची किंमत अंशत: जास्त असू शकते. सध्या ही बाईक 1.93 लाख रुपयांना विकली जात असल्यामुळं त्याचं नवं वर्जन साधारण 2.2 लाख रुपयांच्या घरात असेल असा तर्क काही मंडळी लावत आहेत.