नवी दिल्ली : स्मार्टफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंग भारतीय बाजारपेठेत आपला नवा आणि दमदार स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
सॅमसंग भारतामध्ये आपल्या 'ए' सीरिजचे नवे स्मार्टफोन्स जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लॉन्च करणार आहे. हा 'ए' सीरिजचा नवा स्मार्टफोन असणार आहे जो केवळ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
सूत्रांच्या मते, 'गॅलेक्सी ए8' आणि 'गॅलेक्सी ए8 प्लस' यांच्यात फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचे फिचर्स आहेत. हे फोन्स गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च केले होते.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष (ग्लोबल प्रोडक्ट प्लानिंग, मोबाईल कम्युनिकेशन बिजनेस) जुन्हो पार्क यांनी म्हटले की, 'गॅलेक्सी ए8' आणि 'गॅलेक्सी ए8 प्लस' (2018) च्या लॉन्चिंगसोबत आम्ही फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचे फिचर्स घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये इन्फिनिटी डिस्प्ले आणि रियर कॅमेरा लाईव्ह फोकससोबत देण्यात आला आहे.
इतर फिचर्सचा विचार केला तर यामध्ये मोबाईल पेमेंट आणि डिजिटल वॉलेट सेवा (एमएसटीसह) 'सॅमसंग पे', आयपी68 जलरोधी, धुळ रोधक आणि यूएसबी टाईप-सीसोबतच फास्ट चार्जिंगचा समावेश आहे.
सॅमसंग इंडिया जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात 'गॅलेक्सी ऑन' लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त यापूर्वी समोर आलं होतं. या फोन्सची किंमत 15 हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
गॅलेक्सी ऑन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे आणि दोन्ही फोन्समध्ये 4GB रॅम असणार आहे. हे फोन्स केवळ अॅमेझॉन इंडियावर खरेदीसाठी उपलब्ध असतील.