..म्हणून भारत सरकारने सत्या नाडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! 27 लाख भरण्याचे आदेश

Satya Nadella Fine by Indian Government: यासंदर्भातील एक 63 पानांचा आदेशच जारी करण्यात आला आहे. या आदेशामध्ये एकूण 10 जणांच्या नावांचा समावेश असून त्यातील एक नाव सत्या नाडेला यांच्या नावाचाही समावेश आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 23, 2024, 09:15 AM IST
..म्हणून भारत सरकारने सत्या नाडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! 27 लाख भरण्याचे आदेश title=
यासंदर्भात आदेश जारी करण्यात आला

Satya Nadella Fine by Indian Government: केंद्र सरकारच्या केंद्रीय कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने बुधवारी एक मोठा निर्णय घेतला. मंत्रालयाने 'मायक्रोसॉफ्ट' या जागतिक स्तरावरील कंपनीच्या मालकीच्या 'लिंक्डइन इंडिया' या जॉब सर्च सोशल माध्यमाबरोबरच, 'मायक्रोसॉफ्ट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेलांसहीत 8 जणांविरोधात नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे. देशातील कंपनी कायद्यामधील नफा मिळवून देण्यासंदर्भातील नियमांचं उल्लंघन संबंधितांनी केल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे. 

कोणत्या नियमाचं केलं उल्लंघन?

सत्या नाडेला हे 'मायक्रोसॉफ्ट'चे प्रमुख आहेत. 'मायक्रोसॉफ्ट' कंपनी प्रोफेश्नल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म असलेल्या 'लिंक्डइन'ची मातृक कंपनी आहे. 'मायक्रोसॉफ्ट'ने 2016 साली डिसेंबर महिन्यात 'लिंक्डइन'ला विकत घेतलं होतं. रजिस्ट्रार ऑफ कंपनीच्या (दिल्ली आणि हरियाणा एनसीटी) वतीने 63 पानांचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशामध्ये 'लिंक्डइन इंडिया' आणि कंपनीशीसंबंधित इतर अधिकाऱ्यांनी कंपनी कायदा 2013 मधील मालकांना लाभ मिळवून देणाऱ्यासंदर्भातील नियमाचं म्हणजेच Significant Beneficial Owner (SBO) चं उल्लंघन केलं आहे, असं नमूद करण्यात आलं आहे.

आदेशामध्ये काय म्हटलं आहे?

"..सत्या नाडेला आणि रायन रोस्लान्स्की हे सदर कंपनीच्या एसबीओमध्ये येतात. त्यांनी सेक्शन 90 (1) प्रमाणे अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे ते कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 90 (10) दंडास पात्र ठरतात. रायन रोस्लान्स्की यांना 1 जून 2020 रोजी लिंक्डइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. ते सत्या नाडेला यांना रिपोर्ट करतात," असं कॉर्परेट मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीने म्हटलं आहे. दिलेल्या आदेशानुसार, या आदेशानंतरही कंपनी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती पावलं उचलली नाहीत तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असंही म्हटलं आहे. 

कोणाला किती दंड?

रजिस्ट्रार ऑफ कंपनीने 'लिंक्डइन टेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन प्रायव्हेट लिमिटेड' किंवा 'लिंक्डइन इंडिया' या कंपनीसहीत सत्या नाडेला, रायन रोस्लान्स्की यांना एकूण 27 लाख 10 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीला 7 लाखांचा दंड ठोठावला आहे. तर सत्या नाडेला आणि रायन रोस्लान्स्की यांना वैयक्तिकरित्या प्रत्येकी 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कीथ रेंजर डॉलिव्हर, बेंजामिन ओवेन ऑर्नडॉर्फ, मिशेल कॅटी लेउंग, लिसा एमिको सातो, आशुतोष गुप्ता, मार्क लिओनार्ड नदरेस लेगास्पी आणि हेन्री चिनिंग फाँग हे या प्रकरणामधील इतर 8 अधिकारी आहेत ज्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.  मात्र सदर आदेश मिळाल्यापासून पुढील 60 दिवसांमध्ये आदेशाविरुद्ध प्रादेशिक संचालकांकडे दाद मागता येणार आहे.