चीनी कंपनीच्या स्मार्टफोनला भारतात मोठा प्रतिसाद; काही मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक

चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं जात असताना, चीनी कंपनीचा हा स्मार्टफोन मात्र काही वेळातच आऊट ऑफ स्टॉक झाला आहे.

Updated: Jun 20, 2020, 06:40 PM IST
चीनी कंपनीच्या स्मार्टफोनला भारतात मोठा प्रतिसाद; काही मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : भारत-चीन या दोन देशांमधील संघर्ष टोकाला गेला असताना, याच पार्श्वभूमीवर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहिम भारतभर राबवण्यात येत आहे. अनेक नेतेमंडळींसह, अनेक संस्थांनीही चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. सोशल मीडियावरही याबाबत मोठी चर्चा सुरु आहे. दरम्यान, चीनी मोबाईल कंपनी वनप्लसने आपला लेटेस्ट मोबाईल 'वनप्लस 8 प्रो'चा सेल सुरु केल्यानंतर त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सेल सुरु झाल्यानंतर काही वेळातच हा स्मार्टफोन आऊट ऑफ स्टॉक झाल्याचीही माहिती मिळत आहे. 

भारत-चीन संघर्षादरम्यान, चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याबाबत सांगण्यात येत असताना, दुसरीकडे मात्र चीनी कंपनीचा स्मार्टफोन, भारतात काही मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक झाल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. भारतात या फोनला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. 

भारतात वनप्लस 8 प्रो, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 54,999 इतकी आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 59,999 रुपये आहे.

चीनी स्मार्टफोन कंपनी वनप्लसने (Oneplus) वनप्लस 8 प्रो 5जी स्मार्टफोनचा, सेल 15 जूनपासून सुरु झाला असल्याचं सांगितलं. हा स्मार्टफोन एप्रिल महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. वनप्लस 8 प्रो 5 जी स्मार्टफोनचा सतत पुरवठा करण्याचं आमचं लक्ष्य आहे. या उत्पादनाचा साठा कमी असल्यामुळे आम्ही मर्यादित विक्रीमध्ये स्मार्टफोन बाजारात आणत असल्याचंही कंपनीने सांगितलं आहे.