'सुरेश धस यांना फडणवीसांचा आशीर्वाद', संजय राऊत यांचं मोठं विधान, म्हणाले 'बीडमधील प्रकरण...'

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात दोन आरोपींना अटक केल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच सुरेश धस (Suresh Dhas) यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) आशीर्वाद असल्याचा दावा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 4, 2025, 11:02 AM IST
'सुरेश धस यांना फडणवीसांचा आशीर्वाद', संजय राऊत यांचं मोठं विधान, म्हणाले 'बीडमधील प्रकरण...' title=

बीडमधील प्रकरण योग्य दिशेने न्यायचं असेल, खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर सुरेश धस (Suresh Dhas) पुरेसे आहेत. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) आशीर्वाद आहे. सुरेश धस जे काही बोलत आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाशिवाय बोलणार नाहीत असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसंच पोलिसांच्या तपासात बाधा येईल असं आता काही दिवस करु नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. 

"बीडवर रोज प्रश्न विचारणं आता थांबवलं पाहिजे. याप्रकरणी तपास सुरु असून, ते न्यायप्रविष्ठ आहे. ज्या दिवशी आपल्याला पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात नाही असं वाटेल तेव्हा प्रश्न विचारले पाहिजेत. पोलिसांवर जनतेचा, विरोधी पक्षाचा दबाव आहे. पोलीस किंवा सीआयडीने आतापर्यंत केलेल्या कारवाईवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. रोज उठून प्रश्न विचारत, पोलिसांच्या तपासात बाधा येईल असं आता काही दिवस करु नये," असं संजय राऊत म्हणाले आहेत.  

पुढे ते म्हणाले की, "बीडमधील प्रकरण योग्य दिशेने न्यायचं असेल, खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर सुरेश धस (Suresh Dhas) पुरेसे आहेत. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) आशीर्वाद आहे. सुरेश धस जे काही बोलत आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाशिवाय बोलणार नाहीत. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांनाही बीडमधील दहशतवाद, बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे. ज्या दिवशी आम्हाला वाटेल यात काहीतरी पडद्यामागे वेगळं घडत आहे तेव्हा आम्ही त्याला वाचा फोडू". 

उद्धव ठाकरेंनी बीडला भेट न दिल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, "तिथे जाऊन भूमिका मांडणं, राजकारण करणं यापेक्षा तपासासंदर्भात प्रश्न करणं जे आम्ही करत राहिलो ते महत्त्वाचं आहे. मोर्चाला जाणं, पत्रकार परिषदेला जाणं हे आम्ही केलं. परभणीतील सूर्यवंशी आणि बीडमधील संतोष देशमुख हत्या दु:खदायक आहेत. त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे". 

'लवकरच उद्धव ठाकरे कुटुंबाला जाऊन भेटणार आहेत, राजकारण करण्यासाठी नाही. दोघांच्या कुटंबाला जाऊन भेटतील. पोलीस काय कारवाई करत आहेत याची आम्ही वाट पाहत होतो," अशी माहिती त्यांनी दिली. 

'सामना वाचणं सुंदर सवय'

"देवेंद्र फडणवीस सामना वाचत आहेत ही चांगली बाब आहे. सामना वाचणं सुंदर सवय आहेत. जे सामना वाचतात त्यांचं भविष्य उज्ज्वल असतं. सामना सर्वांचा आहे. मराठानंतर सामना या महाराष्ट्राची भूमिका मांडण्यासाठी निर्माण झाला. सत्य असत्य याची भूमिका सामना मांडत असतं. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम काम केल्याने कौतुक केलं. बीड संदर्भात टीका केली. त्यानंतर त्या टीकेचा योग्य उपयोग झाला आणि बीडच्या बाबतीतही चांगली पावलं टाकली. मुख्यमंत्री एका पक्षाचा नसतो. ताो राज्याचा असतो राज्याच्या हिताचं कोणी चांगलं काम करत असेल तर कौतुक करावं, उणीधुणी काढण्याचं हे व्यासपीठ नाही. पक्षविरहीत सत्ता राबवली जर महाराष्ट्र का कौतुक करणार नाही? मागील अडीच वर्षात पावलं चुकीच्या दिशेने पडली. चुकीच्या लोकांच्या गर्दीत ते अडकले. महाराष्ट्राला आणि राज्यवस्थेला, राजकारणाला यामुळे भोगावं लागलं," असं संजय राऊत म्हणाले.