Suzuki च्या दुचाकी सदोष; परत मागवल्या 4 लाख गाड्या; तुमची गाडी तर यात नाही ना?

Suzuki India Recalls 4 Lakh Two-Wheeler: भारतामधील आघाडीची दुचाकी निर्मिती कंपनी असलेल्या सुझुकीने ग्राहकांना या दुचाकी परत करण्यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. तुमची गाडीही सदोष आहे का कसं कळेल जाणून घ्या...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 28, 2024, 02:52 PM IST
Suzuki च्या दुचाकी सदोष; परत मागवल्या 4 लाख गाड्या; तुमची गाडी तर यात नाही ना? title=
सुझुकी कंपनीने घेतला मोठा निर्णय (प्रातिनिधिक फोटो)

Suzuki India Recalls 4 Lakh Two-Wheeler: भारतामधील आघाडीची दुचाकी वाहननिमिर्ती कंपनी असलेल्या सुझुकीने त्यांच्या 4 लाखांहून अधिक दुचाकी परत मागवल्या आहेत. यामध्ये मोटर सायकल्सबरोबरच स्कूटर्सचाही समावेश असल्याचं सुझुकी इंडियाने सांगितलं आहे. या बाईकमध्ये बसवण्यात आलेले हाय टेन्शन कॉर्ड सदोष असल्याने या गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. दुचाकीच्या इग्निशन कॉइलला कनेक्ट होणारी ही कॉर्ड सदोष असल्याने ती बदलून देण्यासाठी कंपनीने या गाड्या परत मागवल्यात.

कोणत्या गाड्या परत मागवण्यात आल्या?

समोर आलेल्या माहितीनुसार, सुझुकी कंपनीने परत मागवलेल्या सदोष गाड्यांमध्ये 3 लाख 88 हजार 411 स्कूटर आहेत. या सर्व स्कूटर्सची तपासणी केली जाणार आहे. ज्या दुचाकी परत मागवण्यात आल्या आहेत त्यामध्ये अॅक्सेस 125, अवनिस 125 आणि बर्सगमन स्ट्रीट 125 या स्कूटर्सचा समावेश आहे. या तिन्ही मॉडेल्सच्या 30 एप्रिल 2022 ते 3 डिसेंबर 2022 दरम्यानची निर्मिती असलेल्या गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत.

ही बाईकही परत मावगण्यात आली

सुझुकीने परत मागवलेल्या बाईक्सबद्दल बोलायचं झालं तर आधुनिक तंत्रज्ञान असलेली व्ही-स्ट्रोम 800 डीईमध्ये सुद्धा दोष असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. या दुचाकीच्या मागच्या चाकामध्ये दोष असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या बाईकच्या मागच्या चाकामधील काही भाग सुटे होत असून त्यामुळे टायरला भेग पडण्याची शक्यता आहे. म्हणून हा टायर बदलून देण्यात येणार आहे.

तुम्ही गाडी सदोष आहे की नाही कसं ओळखाल?

आता तुमची बाईक या रिकॉलमध्ये म्हणजेच सदोष बाईक परत मागवण्यात आली आहे की नाही हे कसं ओळखाल? यासाठी तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यास तिथे एका service campaign सेक्शनमध्ये तुम्हाला गाडीचा VIN क्रमांक टाकून तुमची स्कुटी किंवा बाईक सदोष बाईकच्या कॅटेगरीमध्ये येते की नाही हे पाहता येईल.

कंपनीच्या अनेक दुचाकी लोकप्रिय

सुझुकी ही देशातील आघाडीच्या दुचाकी कंपन्यांपैकी एक असून या कंपनीच्या बाईक्स आणि स्कुटरही चांगल्याच लोकप्रिय आहेत. कंपनीच्या काही लोकप्रिय मॉडेल्समध्ये सुझुकी अॅक्सेस 125, सुझुकी बर्गमॅन, सुझुकी बर्गमॅन 125, सुझुकी कातना, सुझुकी जिक्स एसएफ, सुझुकी जिक्स 250, सुझुकी व्ही-स्ट्रोम एसएक्स, सुझुकी जीएसएक्स-आर 1000 आर या गाड्यांचा समावेश होतो.