'या' भारतीय Appची टिकटॉकला जबरदस्त टक्कर

भारतात TikTokला पर्याय म्हणून, शॉर्ट व्हिडिओ मेकिंग भारतीय ऍप चर्चेत...

Updated: Jun 29, 2020, 11:01 AM IST
'या' भारतीय Appची टिकटॉकला जबरदस्त टक्कर
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : शॉर्ट व्हिडिओ मेकिंग, शेयरिंग ऍप टिकटॉक भारतभर लोकप्रिय आहे. परंतु भारत आणि चीनच्या वाढत्या संघर्षानंतर चीनी वस्तू, चीनी ऍपवर बहिष्कार टाकण्याची मोहिम भारतभर सुरु आहे. यादरम्यान टिकटॉकला टक्कर देणारं एक भारतीय ऍप चांगलंच चर्चेत आलं आहे. टिकटॉकप्रमाणेच शॉर्ट व्हिडिओ मेकिंग भारतीय ऍप 'चिंगारी' chingari app सध्या अतिशय लोकप्रिय ठरत आहे.

भारतात TikTokला पर्याय म्हणून लोक आता भारतीय 'चिंगारी' ऍपकडे वळताना दिसत असून हे ऍप ट्रेंडिंग चार्ट्समध्ये पोहचलं आहे. आतापर्यंत 25 लाखहून अधिक वेळा 'चिंगारी' ऍप डाऊनलोड करण्यात आलं आहे.

छत्तीसगढमधील आयटी प्रोफेशनल्ससह मिळून ओडिशा आणि कर्नाटकच्या बिस्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम या डेव्हलपर्सनी हे चिंगारी ऍप तयार केलं आहे. चिंगारी ऍपचे प्रमुख सुमित घोष यांनी एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना, हे ऍप तयार करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी जवळपास दोन वर्ष लागली. खासकरुन भारतीयांची आवड आणि गरजा लक्षात घेता या ऍपला डिजाइन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

चिंगारी ऍप chingari app नोव्हेंबर 2018 मध्ये गुगल प्ले स्टोरवर अधिकृतपणे रिलीज करण्यात आलं होतं. परंतु आता चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी वाढली असताना चिंगारी ऍपच्या डाऊनलोडिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतीय युजर्सचा ऍपला चांगला प्रतिसाद मिळत असून 25 लाखहून अधिक वेळा ऍप डाऊनलोड झाल्याचं समजलं असल्याचं, सुमित यांनी सांगितलं. 

भारतात तयार करण्यात आलेलं हे भारतीय ऍप टिकटॉकला चांगलीच टक्कर देत आहे. या ऍपमध्ये व्हिडिओ अपलोड, डाऊनलोड, ट्रेंडिंग न्यूज, चॅटची सुविधा, कंटेंट शेअर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. शिवाय इंग्रजीव्यतिरिक्त 9 भारतीय भाषा हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तमिळ आणि तेलुगू भाषांचा सपोर्ट देण्यात आला आहे. सध्या या ऍपचं रेटिंग 4.6 इतकं आहे.