मुंबई: सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि पुरवठा साखळी व्यत्यय असूनही गेल्या काही महिन्यात गाड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. मे 2022 हा भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी चांगला महिना ठरला आहे. भारतातील 10 सर्वाधिक विकल्या गेलेल्या गाड्यांबद्दल बोलायचे झाले तर त्यात मारुती सुझुकीच्या आठ कारचा समावेश आहे. याशिवाय एक कार ह्युंदाई आणि एक कार टाटाची आहे.
मे महिन्यात देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये मारुती सुझुकी वॅगनआर गाडीचा समावेश आहे. वॅगनआरच्या 16,814 युनिट्सची विक्री झाली आहे. यानंतर टाटा मोटर्सची नेक्सॉन दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात 14,614 कार विकल्या गेल्या आहेत. तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर मारुती सुझुकी स्विफ्ट आणि अलीकडेच लाँच झालेली बलेनो फेसलिफ्ट आहे. स्विफ्टच्या 14,133 आणि बलेनो फेसलिफ्टच्या 13,970 युनिट्सची विक्री झाली.
मारुतीची सर्वात परवडणारी कार अल्टो या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. या गाडीच्या 12,933 युनिट्सची विक्री झाली आहे. यानंतर, नवीन मारुती एर्टिगा सहाव्या क्रमांकावर आणि डिझायर सातव्या क्रमांकावर आहे. मारुती एर्टिगाच्या 12,226 आणि डिझायरच्या 11,603 युनिट्सची विक्री झाली आहे. तर ह्युंदाई क्रेटा आठव्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात एकूण 10,973 युनिट्सची विक्री झाली.
मारुती सुझुकी इको या यादीत नवव्या क्रमांकावर असून एकूण 10,482 युनिट्सची विक्री झाली आहे. वर्षभराच्या आधारे त्याच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाली आहे. मारुती सुझुकी विटारा ब्रेझा 10 व्या क्रमांकावर असून 10,312 युनिट्सची विक्री झाली आहे. नवीन मारुती सुझुकी ब्रेझा भारतात 30 जून 2022 रोजी लाँच होणार आहे.