देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपन्यांपैकी एक असणाऱ्या टीव्हीएस मोटर्सने अखेर आपली बहुप्रतिक्षित दुचाकी TVS Apache RTR 310 ला लाँच केलं आहे. ही बाईक आता भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच झाली असून, विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्पोर्टी लूक, जबरदस्त फिचर्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेली ही बाईक तरुणांच्या पसंतीस पडत आहे.
कंपनीने या बाईकमध्ये असे काही फिचर्स दिले आहेत, जे आजपर्यंत कोणत्याही दुचाकी कंपनीने दिलेले नाहीत. कंपनीची ही स्पोर्ट बाईक सध्याच्या Apache RR 310 तुलनेत 29 हजार रुपयांनी स्वस्त आहे. या बाईकमध्ये पॉवरफूल इंजिनचा वापर करण्यात आला आहे.
नव्या फ्रेमवर डेव्हलप करण्यात आलेल्या या बाईकमध्ये कंपनीने 312 सीसी क्षमतेच्या लिक्विड-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिनचा वापर केला आहे. हेच इंजिन BMW 310 मध्ये मिळतं. हे इंजिन 35.6hp ची पॉवर और 28.7Nm चा टॉर्क जनरेट करतं. या इंजिनला 6 स्पीड गेअरबॉक्सने जोडण्यात आलं आहे. तसंच परफॉर्मन्स बाईक असल्याने यामध्ये असिस्ट आणि स्लीपर क्लचही देण्यात आला आहे. या बाईकचा टॉप स्पीड ताशी 150 किमी आहे. ही बाईक फक्त 2 सेकंदात ताशी 45.6 किमीचा वेग पकडण्यात सक्षम आहे.
या बाईकच्या मागे आणि पुढे दोन्ही बाजूला 17 इंचाचे ड्युअल कंपाऊंड रेडियल टायर देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये 5 वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये अर्बन, रेन, स्पोर्ट, ट्रॅक आणि सुपरमोटो मोड आहेत.
Apache RTR 310 ला लँडस्केप-ओरिएंटेड 5.0-इंच TFT टचस्क्रीन मिळते ज्यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल आहे. या स्क्रीनमध्ये तुम्हाला बाइकशी संबंधित सर्व फीचर्स ऑपरेट करण्याची सुविधा मिळते.
बाईकमध्ये स्लिक एलईडी हेडलाइट आणि टेल लाईट्स याव्यतिरिक्त क्रूझ कंट्रोल देण्यात आला आहे. या बाईकमध्ये कंपनीने सीटला गरम आणि थंड करण्यासाठी क्लायमेट कंट्रोल सिस्टम दिली आहे. हे फिचर भारतात विकल्या जाणाऱ्या कोणत्याच बाईकमध्ये मिळत नाही. या फिचरच्या सहाय्याने तुम्ही उन्हाळ्यात सीट थंड आणि हिवाळ्यात गरम करु शकता.
कंपनीचे म्हणणे आहे की Apache RTR 310 ची अतिशय बारकाईने इंजिनिअर करण्यात आलं आहे. या बाईकमध्ये 5 भिन्न ड्रायव्हिंग मोड आहेत, त्यामुळे प्रत्येक मोडमध्ये तिचे मायलेज देखील बदलते. कंपनीचा दावा आहे की ही मोटरसायकल अर्बन आणि रेन मोडमध्ये 30 किमी/लीटर आणि स्पोर्ट, ट्रॅक आणि सुपरमोटो मोडमध्ये 28 किमी/लीटरपर्यंत स्पीड देते. हे मायलेज ARAI प्रमाणित आहे.
या बाईकचा मुख्य सामना KTM 390 Duke आणि Triumph Speed 400 यांच्याशी असणार आहे. ज्यांची किंमत 2.97 लाख आणि 2.33 लाख आहे. दरम्यान Apache RTR 310 ज्या बाईकवर आधारित आहे त्या Apache RR 310 ची किंमत 2.72 लाख आहे. Apache RTR 310 ची सुरुवातीची किंमत 2.43 लाख आहे.
तुम्ही Apache RTR 310 ला 3,100 रुपयांमध्ये बूक करु शकता. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय आणि इतर ऑनलाइन पेमेंटच्या आधारे हे बुकिंग केलं जाऊ शकतं. याशिवाय, तुम्ही कंपनीच्या अधिकृत डीलरशिपद्वारे देखील बुक करू शकता.