Bikes without Kickstart System: भारतात चारचाकींच्या तुलनेच दुचाकी वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. काळासह बाईकही आता हायटेक होऊ लागल्या आहेत. दरवर्षी बाईकमध्ये नवे बदल होताना दिसत आहेत. बाजारात उपलब्ध असणाऱ्या सर्व बाईकमध्ये सेल्फ स्टार्ट म्हणजेच इलेक्ट्रिक स्टार्ट सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय गरज पडल्यास किक मारुन बाईक सुरु केली जाऊ शकते. पण काही महागड्या आणि प्रीमिअम बाईक्समध्ये कंपन्यांनी किक देणं बंद केलं आहे.
बजाज पल्सर, केटीएम, यमाहाची R15 आणि रॉयल एनफिल्ड क्लासिकसह अनेक दुचाकींमध्ये किक देण्यात आलेली नाही. जर सेल्फ स्टार्ट खराब झाला तर किकचा वापर करत दुचाकी सुरु केली जाते. पण जर बाईकला किकच नसेल तर अशा स्थितीत काय करणार? असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. तसं पाहायला गेल्यास यामागे तांत्रिक कारण आहे. पण सोप्या भाषेत हे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करुयात.
जेव्हा सुरुवातीला बाईक आल्या, तेव्हा त्यामध्ये सेल्फ स्टार्टचा पर्याय नसायचा. त्यावेळी बाईक सुरु होण्यापासून ते इंजिनपर्यंत इंधन पोहोचवण्याचं सर्व काम मॅन्यूअली होत होतं. याचा अर्थ जेव्हा तुम्ही किक मारुन बाईक सुरु करायचा तेव्हा स्पार्क आणि क्रेंपच्या मदतीने इंजिन सुरु व्हायचं आणि प्रेशरच्या मदतीने कार्बोरेटरच्या मदतीने इंजिनपर्यंत पेट्रोल पोहोचायचं. याशिवाय बाईकची लाईट आणि इंडिकेटर्सदेखील इंजिनमधून निर्माण होणाऱ्या ऊर्जैवर चालत होते. तुम्ही जर कधी नीट लक्ष दिलं असेल, तर जेव्हा बाईक सुरु होते तेव्हा हेडलाइट बंद सुरु होते. पण जेव्हा एक्सलेटर दिलं जातं तेव्हा ती पूर्णपणे सुरु व्हायची.
आजकालच्या बाईकमध्ये फ्यूएल इंजेक्टरची सिस्टीम देण्यात आली आहे. यामध्ये टँकपासून ते इंजिनपर्यंत इंधन पोहोचवण्यासाठी एक मोटर लावण्यात आली आहे. ही मोटर बॅटरीतून मिळणाऱ्या लाईटवर चालते. पण जर बॅटरी पूर्णपणे डाउन झाली तर इंधन इंजिनपर्यंत पोहोचणारच नाही. अशा स्थितीत किक मारुन बाईक सुरु करण्याचा प्रयत्न केला तर होणार नाही.
याशिवाय आधी बाईकचा सेल्फ फार लवकर खराब व्हायचा. यासाठी कंपनीने बरंच काम केलं आणि यावर उपाय शोधला आहे. यामुळे महागड्या बाईकमधून किकस्टार्ट सिस्टिमची गरज संपली आहे. या बाईक्स एनर्जी रिजनरेटिव्ह सिस्टमच्या माध्यमातून स्वत: चार्ज होतात. यामुळे बॅटरी कधीच डाऊन होत नाही.