वाहनांचे टायर्स काळ्या रंगांचे का असतात? लाल, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगात नसल्याचं कारण काय? जाणून घ्या

प्रत्येक वाहनाच्या टायर्सची लांबी, रुंची आणि उंची वेगळी असते. मात्र एक बाब कायम असते ती म्हणजे या टायर्सचा रंग काळा असतो.

Updated: Aug 26, 2022, 04:48 PM IST
वाहनांचे टायर्स काळ्या रंगांचे का असतात? लाल, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगात नसल्याचं कारण काय? जाणून घ्या title=

Why Tyre Color Is Black Know Reason Behind Of It: रोज नजरेस पडणाऱ्या वस्तूंबाबत आपल्याला तसं कौतुक नसतं. मात्र अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की ठरावीक वस्तू अशीच का? त्यामागे नेमकं कारण काय असू शकतं? असाच एक प्रश्न सायकलपासून कार, ट्रक, विमानच्या टायर्सबाबत आहे.  प्रत्येक वाहनाच्या टायर्सची लांबी, रुंची आणि उंची वेगळी असते. मात्र एक बाब कायम असते ती म्हणजे या टायर्सचा रंग काळा असतो. तुम्ही जगात कुठेही गेलात तरी तुम्हाला टायर्स काळ्या रंगातच दिसतील. त्यामुळे टायर्स इतर रंगाचे का नसतात? असा प्रश्न पडतो. चला तर मग याबाबत जाणून घेऊयात

फ्रेंच शब्द टायररपासून टायर्सची या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. टायरर म्हणजे ताणणारा. टायर्स निर्मितीचा इतिहास 1800 सालापासून सुरु झाला आहे. रबर टायरच्या आधी, टायर चामड्याचे, लोखंडाचे किंवा लाकडाचे बनवलेले असायचे. व्हीलराइट नावाच्या एका कारागिराने सर्वात प्रथम टायरचा शोध लावला. त्यानंतर चार्ल्स मॅकेंतोषने अॅमेझॉन आणि इतर वृक्षांपासून निघणाऱ्या द्रावातून रबर बनवला. मात्र परिस्थितीशी जुळवून घेण्यात अपयश आल्याने हा प्रयोग फसला. त्यानंतर गुडईयरने 1839 मध्ये वूलकॅनाइज्ड रबराची निर्मिती केली. याचा रबरी टायरचा वापर पहिल्यांदा सायकलमध्ये करण्यात आला. त्यानंतर 1845 मध्ये न्यूमेटिक टायर तयार केले गेले.  

125 वर्षांपूर्वी टायरची निर्मिती केली गेली तेव्हा टायरचा रंग पांढरा होता. मात्र हा टायर ज्या पदार्थाने तयार केला होता. त्यात तग धरण्याची हवी तशी ताकद नव्हती. त्यामुळे वजन पेलू शकेल अशा टायर्सची निर्मिती करण्याचा विचार पुढे आला. यासाठी रबरात कार्बन ब्लॅकसारखं मटेरियल मिश्रित करण्यात आले. यामुळे टायर्सचा रंग काळा झाला. तसेच टायर्सची क्षमता पूर्वीपेक्षा अधिक पटीने वाढली. 

रस्त्यावर टायर्सची घर्षण क्षमता वाढल्याचं दिसून आलं. तसेच तापलेल्या रस्त्यावरही टायर्सची क्षमता अधिक होती. त्यामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांनी या टायर्सला पसंती दिली.  इतकेच नाही तर कार्बन ब्लॅक टायर्स ओझोन ते अतिनील किरणोत्सर्गाच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहेत.