नवी दिल्ली - स्वस्तात मस्त स्मार्टफोन म्हणून भारतात प्रसिद्ध झालेल्या रेडमी हॅण्डसेटधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चीनमधील हॅण्डसेट निर्मितीतील मोठी कंपनी शाओमीने त्यांच्या मुख्य ब्रॅण्डपासून रेडमीला आता वेगळे केले आहे. म्हणजे रेडमी आता स्वतंत्र ब्रॅण्ड म्हणून बाजारात उपलब्ध होईल. असे करण्यामागचे नेमके कारण कंपनीने स्पष्ट केलेले नाही. विविध फिचर असलेले स्मार्टफोन स्वस्तात उपलब्ध करून दिल्यामुळे रेडमी हॅण्डसेट भारतात तरुणाईच्या पसंतीस पडले होते. अनेक तरुण-तरुणींनी रेडमी फोन घेण्यालाच प्राधान्य दिले होते.
गिझ्मो चायनाने दिलेल्या वृत्तानुसार, शाओमीने रेडमी स्मार्टफोन हे स्वतंत्र ब्रॅण्ड म्हणून बाजारात उतरविण्याचे निश्चित केले आहे. येत्या १० जानेवारी रोजी रेडमीचा नवा हॅण्डसेट लाँच केला जातो आहे. त्याच्या सोहळ्यापासूनच हा स्वतंत्र ब्रॅण्ड म्हणून पुढे आणला जाईल. या कार्यक्रमात ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर असलेला नवा हॅण्डसेट लाँच करण्यात येणार आहे.
शाओमी कंपनीचे ग्राहकांच्या खिशात बसण्यायोग्य रेडमी आणि रेडमी नोट या दोन हॅण्डसेटला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. दोन्ही ब्रॅण्डवर स्वतंत्रपणे काम करता यावे आणि दोन्हींचा वापर वाढावा, यासाठी हा घटस्फोट करण्यात आल्याचे कंपनीचे संस्थापक ली जून यांनी सांगितले. रेडमीच्या माध्यमातून स्वस्तातले स्मार्टफोन बाजारात आणले जातील. तर शाओमी ब्रॅण्डच्या माध्यमातून अत्याधुनिक हॅण्डसेट निर्माण केले जातील. रेडमीचे हॅण्डसेट ई-कॉमर्स वेबसाईट म्हणजेच ऑनलाईन विकले जातील. तर शाओमीचे हॅण्डसेट ऑनलाईनसह इतरही मार्गांनी विकले जातील. विबो या मायक्रोब्लॉगिंग साईट याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.