SHAREit ला SENDit चा पर्याय, मराठमोळ्या तरुणाने बनवला App

मराठमोळ्या तरुणाने बनवला डेटा शेअर करण्यासाठी App

Updated: Jul 13, 2020, 04:50 PM IST
SHAREit ला SENDit चा पर्याय, मराठमोळ्या तरुणाने बनवला App title=

मुंबई : भारत सरकारने काही दिवसांपूर्वी चिनी अॅपवर बंदी घातली. सरकारने डिजीटल स्ट्राईक करत चीनला मोठा धक्का दिला होता. मोदी सरकारने एकूण ५९ अॅपवर बंदी घातली होती. ज्यामध्ये शेअरइट, टिकटॉक सारख्या महत्त्वाच्या अॅपचा देखील समावेश होता. या दरम्यान वोकल टु लोकलचा नारा पंतप्रधानांनी दिला होता.

शेअरईट सारखा झटपट शेअरिंग अॅप बंद झाल्याने नेटीझन्सची गोची झाली. पण याच संधीचा एका मराठमोळ्या तरुणाने फायदा उचलला.  मुळचा यवतमाळमधील पुसदचा राहणारा तेजस तायडेने नवं अॅप बनवलं आहे.

शेअरईटच्या तोडीस तोड भारतीय शेअरिंग अॅप बनवायचं, असं तेजसने या अॅपवर बंदी येण्याआधीचं ठरवलेलं. पण चिनी अॅपवर बंदी टाकण्यात आली. त्यामुळे ही बंदी तेजसच्या पथ्यावर पडली. या अॅपसाठी तेजसने आपल्या टीमसोबत या अॅपचं काम करायला सुरुवात केली. 

संपूर्ण भारतात तेव्हा लॉकडाऊनचे वारे वाहत होते. मार्च 2020 मध्ये तेजस आपल्या टीमसोबत सेंडइट अॅपसाठी काम करत होता. तेजसला हे अॅप बनवण्यासाठी त्याच्या मित्रांनीही मदत केली. प्रथमेश आणि धीरज असं त्या दोघांचं नाव. हे अॅप पूर्णत्वास येण्यास ४ महिन्यांचा कालावधी लागला.

शेअरइट पेक्षा वेगळं काय ?

सध्याचा जमाना हा डिजीटल. बहुतांश कामं ही मोबाईलद्वारेच होतात. त्यामुळे जितकी सुविधा तेवढाच धोका हा आलाच. त्यामुळे कोणतही अॅप वापरताना डेटासेफ्टीचा प्रश्न सर्वात आधी उद्भवतो. 

सेंडइट अॅप हे डेटासेफ्टीच्या तुलनेत शेअरइटपेक्षा सेफ असल्याचं तेजस सांगतो. शेअरइटच्या तुलनेत सेंडइटद्वारे अधिक वेगाने डेटा शेअर करता येणार, अशी माहिती तेजसने दिली.

सेंडइट हा शेअरिंग अॅप 12 जुलैपासून प्लेस्टोअरवर उपलब्ध करण्यात आला आहे. सध्या हा अॅप एंड्रोइड युझर्ससाठी आहे. या अॅपचं सध्याचं 2.0 व्हर्जन आहे. लवकरच हे अॅप आययोएस वापरकर्त्यांच्या सेवेत येणार आहे. याचं कामही अंतिम टप्प्यात सुरु आहे.

सेंडइट हे अॅप अवघ्या काही तांसामध्ये हजारपेक्षा जास्त जणांनी डाऊनलोड केलं आहे. शेअरइट या चिनी अॅपला पर्याय दिल्याने तसेच मराठी मुलांनी हे अॅप डेव्हलप केल्याने तेजस आणि त्याच्या मित्रांचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जातंय.

तेजस आणि त्याच्या टीमचा अल्पपरिचय

तेजसने बीएसस्सी इन फिल्ममेकिंगचं शिक्षण अर्धवट झालंय. यानंतर त्याने ग्राफीक डिझायनिंग, कोडींग आणि वेब डेव्हलपिंग यासारखे कोर्स केले आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत तेजसने 10 पेक्षा अधिक वेबसाईट तयार केल्या आहेत. तसंच तेजस हा महाराष्ट्र सकारात्मक कृती समितीचा सदस्यही आहे.  

तेजसला हे अॅप बनवण्यासाठी त्याच्या दोन मित्रांनीही मदत केलीय. प्रथमेश चोपडे आणि धीरज पाध्ये अशी या तरुणांची नावं आहेत. या दोन्ही तरुणांनी अभियांत्रिकीमध्ये पदवीपर्यंतच शिक्षण घेतलंय. 

अपकमिंग प्लानिंग

तेजस आपल्या टीमसोबत आणखी काही अॅपसाठी काम करतोय. नेटीझन्ससाठी लवकरच तो नवीन अॅप आणणार आहे.