गरीबांची लूटमार करणाऱ्या कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द; रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे बोलणं भोवलं

 राज्यभर कोविड संकट अधिक गहिरे होत चालले आहे. खाटांची उपलब्धता आणि उपचारातील अक्षम्य हयगय यामुळे रुग्ण त्रस्त आहेत. 

Updated: May 7, 2021, 06:40 PM IST
गरीबांची लूटमार करणाऱ्या कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द; रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे बोलणं भोवलं

आशीष अम्बाडे , झी मीडिया, चंद्रपूर :  राज्यभर कोविड संकट अधिक गहिरे होत चालले आहे. खाटांची उपलब्धता आणि उपचारातील अक्षम्य हयगय यामुळे रुग्ण त्रस्त आहेत. सरकारी इस्पितळे रुग्णांचा हा भार पेलू शकत नसल्याने खाजगी रुग्णालयांना उपचाराची परवानगी देण्यात आली. या खाजगी रुग्णालयाबाबत विविध नियम घालून देण्यात आले आहेत. मात्र कोरोना संकटाचे विक्राळ रूप बघता आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा हतबल आहे. ही रुग्णालये यंत्रणेचा वचक नसल्याने रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा वसुली करत आहेत. 

चंद्रपुरात श्वेता रुग्णालयात दाखल एका रुग्णाला आलेले आवास्तव बिल पाहता नातेवाईक हबकून गेले. डॉ. रितेश दीक्षित या रुग्णालयाचे संचालन करतात. नातेवाईकांनी एवढ्या मोठ्या बिलाबाबत विचारणा केल्यावर डॉ. दीक्षित यांनी अरेरावी करत त्यांना उद्धट वागणूक दिली. हा सर्व संवाद मोबाईल रेकॉर्ड करत हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकला गेला. हा व्हिडिओ प्रचंड वायरल झाला.

 यात डॉ. दीक्षित यांनी वाढीव बिलाबाबत समाधानकारक स्पष्टीकरण दिले नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर या प्रकरणाची मनपाच्या कोविड ऑडिट समितीने तपासणी केली. यात तक्रारीत तथ्य आढळून आले. मनपाने यावर कठोर कारवाई करत खाटांची स्थिती नाजूक असताना देखील श्वेता रुग्णालयाची कोविड उपचार केंद्र म्हणून असलेली मान्यता रद्द केली. 
 
 सततच्या कोरोना रुग्णवाढीने त्रस्त चंद्रपूर शहरात रुग्णसेवेला गालबोट लावणा-या या प्रकारावर धडक कारवाई झाल्याने चंद्रपूर मनपाने रुग्ण आणि नातेवाईकांना दिलासा दिलाय. रुग्णांशी अभद्र वागणुकीच्या तक्रारीनंतर रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द झाल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
 
 गेले काही महिने खाजगी रुग्णालयात खाटांची उपलब्धतता असताना ही रुग्णालये मात्र खाटा उपलब्ध नसल्याची एकसुरी माहिती प्रशासनाला देत आहेत. मात्र दुसरीकडे आपल्या मर्जीनुसार रुग्ण दाखल करत त्यांच्याकडून भरमसाठ बिल वसुली केली जात होती. हा व्यवहार सर्वश्रुत असताना केवळ परिस्थिती नाजूक असल्याने कारवाईचा निर्णय घेणे प्रशासनाला अवघड झाले होते. यावर उपाय म्हणून १ आठवड्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने 'खाटांच्या उपलब्धतेबाबत' एक सर्वसमावेशक सॉफ्टवेअर तयार केले. आता रुग्ण दाखल करताना थेट भरती करणे अवैध झाले आहे. त्यामुळेच अशा पैसे उकळण्याच्या प्रकाराला चाप बसणार आहे. 
 
 खाजगी रुग्णालयाद्वारे प्रशासनाला अधिकृत आकडा दिलेले बेड्स आणि प्रत्यक्ष दाखल रुग्ण याबाबत जिल्हास्तरीय कोविड टास्क फोर्सने आकस्मिक भेटी देत शहानिशा करणे गरजेचे झाले आहे. शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या मुख्य कोविड रुग्णालयात काम करणा-या एका डॉक्टरने चक्क सरकारी रुग्णालयासमोर अवैध-विनापरवाना कोविड रुग्णालय थाटल्याचे एका धाडीत स्पष्ट झाले होते. डॉ. शफिक शेख नामक MBBS डॉक्टरच्या या धाडसाने प्रशासकीय यंत्रणा देखील आश्चर्यचकित झाली होती. मात्र हे रुग्णालय बंद करून मनपाने डॉक्टरी व्यवसायाला संकटकाळात शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. 
 
 यापुढच्या काळात जिल्हाभर थेट रुग्णालयात वितरित केले जाणारे जीवरक्षक रेडीसीवीर इंजेक्शन काळ्याबाजारात कोण आणि कसे पाठवत आहे याचा मागमूस लावणे यंत्रणेपुढे मोठे आव्हान असणार आहे. यातला मलिदा वैद्यकीय व्यवसायातील कुणाकुणाला जात आहे ? संकटात संधी कोण साधत आहेत ? अशांचे बुरखे फाडणे महत्वाचे असणार आहे.