पुण्यातील नाईट लाईफवर पोलिसांचा बडगा, १२ हॉटेल्स आणि पबवर छापे

कोणालाही सुगावा न लागू देता पहाटे १ ते ४ या काळात छापे

Updated: Aug 12, 2018, 01:57 PM IST
पुण्यातील नाईट लाईफवर पोलिसांचा बडगा, १२ हॉटेल्स आणि पबवर छापे title=

पुणे: पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्स आणि पबवर शनिवारी रात्री पोलिसांकडून छापे टाकण्यात आले. रात्री-बेरात्री सुरु असलेल्या तरुणाईच्या धिंगाण्याला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. 

विशेष म्हणजे पोलिसांनी रात्रभरात एक-दोन नव्हे तर तब्बल १२ हॉटेल्स आणि पबवर छापे टाकले. बहुतांश हॉटेल्स आणि पब  कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरातील आहेत. चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. कोणालाही सुगावा न लागू देता पहाटे १ ते ४ या काळात पोलिसांनी छापासत्र राबवले. जेव्हा कारवाई झाली तेव्हा या हॉटेलांमध्ये ६-७ हजार तरूण-तरूणी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांत मध्यरात्रीनंतर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पब्सचे , क्लब्सचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे स्थानिकांना खूप त्रासही होतो. याबाबत अनेक तक्रारीही पोलिसांकडे आल्या होत्या. याच तक्रारींची दखल घेत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॉम्बे पोलीस अॅक्ट अंतर्गत मॅक्लारेन पब,डेली ऑल डे, द बार स्टॉक,मियामी, जे डब्ल्यू मेरियेट हॉटेल चतुश्रुंगी, नाईट रायडर, नाईट स्काय, वेस्टइन, पेन्टहाऊस, हार्डरॉक, ओकवूड लाऊन्ज आणि ब्ल्यू शॅकवर कारवाई केली.