पुणे: अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात पुन्हा शाब्दिक खटका उडाला आहे. मनेका गांधींनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या नव्या पत्रात वन खात्यावर गंभीर आरोप केलेत. यानंतर मुनगंटीवारांनी मनेका गांधींवर जोरदार पलटवार केला.
अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच तिचे 'एन्काऊंटर' करण्यात आले. यामध्ये नियमांचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही. तरीही निष्कारण माझ्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. पण मी हे स्पष्टपणे सांगतो की, माझा राजीनामा मनेका गांधी नव्हे तर, भाजप अध्यक्ष अमित शहा मागू शकतात, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.
अवनी वाघिणीला ठार मारल्यानंतर मनेका गांधींनी वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून गंभीर आरोप केलेत. अवनी वाघिणीच्या बछड्यांना वाचवण्यासाठी वनखाते काहीही प्रयत्न करत नाही, असा त्यांचा आरोप आहे.