कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : तिहेरी हत्याकांडाने अहमदनगर (Ahmednagar Crime) जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. जावयाने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार शिर्डीत (Shirdi) घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Ahmednagar Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. दरम्यान तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला नाशिकमधून अटक केली आहे.
शिर्डीजवळील सावळीविहीर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने धारदार शस्राने वार करत तिघांची निर्घृण हत्या केली आहे. तर सासू, सासरे आणि मेव्हणी यांच्यावरही हल्ला करुन आरोपीने त्यांना गंभीर जखमी केले आहे. जखमींवर शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जावई सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिर्डी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनं सावळीविहीर गावात खळबळ उडाली आहे.
कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये पत्नी वर्षा सुरेश निकम (वय 24), मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड (वय 25), आजे सासू हिराबाई द्रौपद गायकवाड (वय 70) या तिघांचा समावेश आहे. सासरे चांगदेव द्रोपद गायकवाड (वय 55), सासू संगीता चांगदेव गायकवाड (वय 45), मेव्हणी योगिता महेंद्र जाधव (वय 30) अशी जखमींची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
सावळीविहीर गावातील विलासनगर परिसरात गायकवाड कुटुंबिय राहत होते. बुधवारी रात्री उशीरा चांगदेव गायकवाड यांचा जावाई सुरेश निकम हा घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याने सर्वात आधी समोर आलेल्या आजी सासूवर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे सुरेशी पत्नी आणि मेव्हणा त्यांना सोडवण्यासाठी पुढे आले. मात्र सुरेश निकमनं त्यांच्यावरही सपासप वार केले. त्यानंतर त्याने मेव्हणी, सासू आणि सासरे यांच्यावरही चाकून वार केले. चाकूहल्ला केल्यानंतर सुरेश निकम त्याचा चुलतभाऊ रोशनसह घटनास्थळावरुन पळून गेला.
आरोपी सुरेश निकम याचा पत्नीसोबत वाद सुरु होता. कुटुंबाकडून छळ होत असल्याने सुरेशची पत्नी माहेरी आली होती, अशी माहिती योगिता जाधवनं केला. पत्नी माहेरी राहत असल्यानं सुरेश निकम तिला घेण्यासाठी गेला होता. मात्र सासरच्यांनी तिला पाठवलं नाही. याचाच राग सुरेशच्या मनात होता. दरम्यान, या हत्याकांडानंतर शेजारच्यांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सुरेशचा तपास करुन त्याला नाशिकमधून ताब्यात घेतलं आहे.