रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली: कोयना धरणातून पाण्याचा मोठ्याप्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी कृष्णा नदीची पाणीपातळी ३२ फुटांवर जाऊन पोहोचली. त्यामुळे शहरातील सुर्यवंशी प्लॉटमधील घरांमध्ये पाणी शिरले आहे. यानंतर प्रशासनाकडून येथील १० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
पुण्यात धरणक्षेत्रात दमदार पाऊस; पाण्याची चिंता मिटली
कृष्णा नदीसह वारणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्यामुळे नदीकाठावरील १०४ गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सांगली शहरात रात्रीपासून चारशेहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले. पूरबाधितांसाठी शहरातील शाळा आणि रिकाम्या इमारतींमध्ये थांबण्याची व्यवस्था केली आहे. सध्या वारणा धरणातून तब्बल १५ हजार क्युसेक्स तर कोयना धरणातून ५५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पुणे आणि साताऱ्यात मुसळधार पावसाचा इशारा
पुणे आणि साताऱ्यात सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागातील एका आधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि साताऱ्याशिवाय मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
अलमट्टी धरणातून ४० हजार क्युसेक्सने विसर्ग वाढविला
सकाळी सात वाजता २ लाख १० हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू होता. आत्ता हाच विसर्ग २ लाख ५० हजार क्युसेक्स इतका करण्यात आला आहे.