Monsoon News : उन्हाच्या झळांनी जीवाची काहिली केलेली असतानाच 'ये रे ये रे पावसा रुसला का' असं लहानगे म्हणज असतानाच अखेर त्या वरूणराजाला दया आणि तो मनसोक्त बरसू लागला. शुक्रवारी रात्रीपासूनच मुंबई, नवी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं हेजरी लावली. शनिवारची सकाळ उजाडली तरीही या पावसानं उसंत घेतली नव्हती ही महत्त्वाची बाब. 23 जून रोजी सायंकाळनंतर पावसाच्या ढगांनी मुंबईसह बऱ्याच भागांमध्ये दाटी करण्यास सुरुवात केली आणि अखेर पावसाची सुरुवात झाली.
फक्त मुंबईच नव्हे, तर नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांतील काही भाहातही पाऊस झाला. चेंबूर, सांताक्रूझ लिंक रोड, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, बांद्रा या भागात पाऊस झाला. तर तिथे पालघरमध्येही रिमझिम पावसानं हजेरी लावली.
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे मान्सून अजूनही कोकणातच रेंगाळला आहे. परिणामी मुंबईत मान्सून वारे दाखल झालेले नाहीत. त्यामुळं सध्या सुरु असणारा पाऊस हा मान्सून पूर्व असल्याचं आता स्पष्ट होत आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळं येत्या काळात तो आणखी जोर धरेल अशीच शक्यता वर्तवली जातेय.
असं असतानाच तिथं विदर्भात पुढील तीन दिवसांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर गडचिरोली आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, वर्धा, गोंदियात तसंच पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. इतकंच नाही, मुंबई आणि ठाण्यातही 26-27 जूनला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे वेधशाळेचे महासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार विदर्भाच्या काही भागात आज मान्सूनचं आगमन झालं असून, पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मान्सूनचा प्रवास आता रुळावर येत असतानाच तिथं तळकोकणात निसर्ग बहरण्यास सुरु झाला आहे. सिंधुदुर्गात पावसाने हजेरी लावली असून बळीराजा आनंदी झाला आहे. मात्र हा पाऊस जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी तालुक्यासह काही भागातच बरसला. त्यामुळे उर्वरित जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.