सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले पराभवाच्या छायेत

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे.

Updated: Oct 24, 2019, 11:32 AM IST
सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले पराभवाच्या छायेत title=

सातारा: भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी तब्बल ९४ हजार मतांची आघाडी घेतली आहे. प्रत्येक फेरीअखेर श्रीनिवास पाटील यांची आघाडी वाढताना दिसत आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे. 

लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पोटनिवडणुकीत उदयनराजे यांच्याविरोधात संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयनराजे भोसले यांच्यासाठी साताऱ्यात सभाही घेतली होती. मात्र, साताऱ्यात शरद पवारांनी भर पावसात घेतलेल्या सभेने ऐन मतदानाच्या आधी वातावरण फिरले होते. याचे प्रतिबिंब निकालात पडणार का, याची उत्सुकता सर्वांनाच होती.

LIVE निकाल पश्चिम महाराष्ट्राचा: बारामतीमधून अजित पवार ४३ हजार मतांनी आघाडीवर 

अखेर आजचा साताऱ्याचा निकाल पाहता येथील जनतेने उदयनराजेंना नाकारल्याचे दिसत आहे. याशिवाय, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीला धक्का दिल्याचे दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण चित्र पाहता ही देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातील थेट लढाई असल्याचे मानले जात आहे. याठिकाणी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरवले होते. सध्याची परिस्थिती पाहता यामध्ये शरद पवारांनी बाजी मारल्याचे दिसत आहे.