Girl Students Sexual Harassment In Nashik: नाशिक जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी प्रसूत झाल्याची घटना चर्चेत असतानाच आधिवासी विकास विभाग्चाया आणखीन एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका एकलव्य निवासी शाळेतील सातव्या इयत्तेतमधील 15 ते 20 विद्यार्थिनींशी तेथील शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल आदिवासी विभागाने घेतली आहे. या शिक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तर अन्य 2 शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
नाशिकमधील एका आदिवासी एकलव्य निवासी शाळेतील शिक्षक विद्यार्थिनींना शिकवण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. त्याच्याकडून अनेकदा असे प्रकार घडले. सुरुवातीला या मुलींनी याकडे विशेष लक्ष दिलं नाही. मात्र काही मुलींनी धाडस दाखवत पालकांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणात कळवण प्रकल्प कार्यालयाच्या विशाखा समितीने चौकशी केली आहे.
पीडित मुलींनी नोंदवलेल्या जबाबानुसार संबंधित शिक्षकाने वारंवार अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणाचा अहवाल विशाखा समितीने प्रकल्प कार्यालयाला सादर केला होता. याबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आदिवासी आयुक्तालयास जाब विचारला. आदिवासी विकास आयुक्त मुंबईत असून उपायुक्त विनीता सोनावणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित शिक्षक आणि 2 महिला शिक्षकांवर तत्काळ निलंबनाची कारवाई केली.
या प्रकरणासंदर्भात बोलताना विनीता सोनवणे यांनी प्राथमिक माहितीनुसार संबंधित शिक्षक दोषी असल्याने त्याला निलंबित करण्यात आल्याचं सांगितलं. "विशाखा समितीच्या अहवालानुसार संबंधित शिक्षक प्रथमदर्शनी दोषी असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये 2 महिला शिक्षकांची नियुक्तीसुद्धा रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये संबंधित शिक्षकाची विभागीय चौकशी केली जाणार आहे," अशी माहिती विनीता सोनावणे यांनी दिली.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष गणेश गवळी यांनी या प्रकरणासंदर्भात बोलताना आंदोलनाचा इशारा दिला आहे. "आदिवासी विभागाच्या निवासी शाळेतील सातव्या इयत्तेमधील 15 ते 20 विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आला आहे. संबंधित शिक्षकावर निलंबानी कारवाई करण्यात आली असली तरी मुलींच्या सरक्षिततेच्या मुद्द्यावर आम्ही आंदोलन छेडणार आहोत," असं गवळी यांनी म्हटलं आहे.