मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साड्यांचे हटके लूक

इंग्रजी नववर्षाच्या सुरूवातीलाच येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 9, 2018, 11:19 PM IST
मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साड्यांचे हटके लूक  title=
Sayali Rajadhyaksha Facebook Page

मुंबई : इंग्रजी नववर्षाच्या सुरूवातीलाच येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत.

येत्या रविवारी 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. ''तिळ गुळ घ्या गोड गोड बोला'' असं म्हणत हा दिवस सगळा राग रुसवा विसरून साजरा केला जातो.  मकर संक्रांत या सणाचं वेगळेपण म्हणजे एरवी अशुभ मानला जाणारा काळा रंग हा या दिवशी आवर्जून वापरला जातो. 

नववधु किंवा घरातील लहान मुलांची पहिली संक्रांत ही आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्या दागिने घातले जातात. तसेच या दिवशी स्त्रिया आवर्जून काळ्या रंगाच्या साड्या परिधान करतात. इरकल, चंद्रकला, खडीची साडी, काटापदराच्या साड्या किंवा सिल्कच्या काळ्या रंगाच्या साड्या महिला या दिवशी आवर्जून घालतात. मात्र आता हळूहळू हा ट्रेंड बदलत चालला. 

मकर संक्रात हा सण घरगुती न राहता आता तो कार्पोरेट सेक्टरमध्ये देखील उत्साहाने साजरा केला जातो. घरगुती समारंभ व्यापक झाल्यामुळे यामध्ये अनेक बदल झाले आहेत. स्त्रियाचं नाहीत तर आता मुली देखील काळ्या रंगाच्या साड्या या दिवशी नेसतात. पण फक्त प्लेन, साध्या काळ्या साड्या नेसण्याबरोबरच थोडा हटके लूकच्या साड्या नेसण्याकडे स्त्रियांचा कल असतो. 

काळ्या रंगाच्या साड्यांचा हटके लूक 

अशा वेळी ब्लॉगर, डिझाइनर सायली राजाध्यक्ष यांनी हटके साड्या बाजारात आणल्या. आणि या साड्यांना अपेक्षेपेक्षा जास्त पसंती मिळाली. यासंदर्भात Zee मराठी दिशाने त्यांच्याशी संवाद साधला. सायली राजाध्यक्ष यांनी मकर संक्रांतीचं औचित्य साधून काळ्या रंगात वेगवेगळे बदल करून हटके लूक दिलेल्या साड्या समोर आणल्या. या साड्यांमध्ये त्यांनी काळ्या लीननच्या साड्या, काळ्या रंगाच्या साड्यांना सिक्ल बॉर्डर लावल्या तसेच काळ्या फेस प्रिंटेट साड्यांना खणाचे जोड लावून एक अनोखी साडी तयार केली. तसेच काही काळ्या साड्यांना दुपट्टा किंवा पोताचे कापड लावून नवा ट्रेंडी लूक दिला आणि तो तेवढाच चांगला पसंतही केला गेला. 

हल्ली काळा रंग हा फक्त मकर संक्रांती पुरताच मर्यादित राहिलेला नाही. तर संध्याकाळच्या कोणत्याही कार्यक्रमांना काळा रंग हा आवर्जून घातला जातो. त्यामुळे काळ्या रंगाच्या साड्यांना अधिक पसंती आहे, असं सायली राजाध्यक्ष सांगतात. तसेच काळा रंग हा अधिक ट्रेंडी आहे. हा रंग कुणीही घातला तर तो अधिक चांगला दिसतो. 

फॅशनच्या दोन खास टिप्स 

आपण करू ती फॅशन असते. प्रत्येकीला कळतं आपल्याला काय चांगल दिसतं आणि काय नाही तर ते लक्षात घेऊन फॅशन करावी अशा दोन खास टिप्स सायली राजाध्यक्ष यांनी दिल्या.