पैठणीला नव्यानं ओळख देणारं होम मिनिस्टर

येवल्याची पैठणी सातासमुद्रापार पोहोचलीय.... मधल्या काळात ती थोडीशी विस्मरणात जाईल की काय, असं वाटत होतं.... पण पैठणीला उभारी देण्यात महत्त्वाचा वाटा आहे तो झी मराठीवरच्या होम मिनिस्टरचा...... 

Updated: Dec 4, 2017, 02:15 PM IST
पैठणीला नव्यानं ओळख देणारं होम मिनिस्टर title=

चेतन कोळस/ अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : येवल्याची पैठणी सातासमुद्रापार पोहोचलीय.... मधल्या काळात ती थोडीशी विस्मरणात जाईल की काय, असं वाटत होतं.... पण पैठणीला उभारी देण्यात महत्त्वाचा वाटा आहे तो झी मराठीवरच्या होम मिनिस्टरचा...... 

पैठणी म्हणजे महाराष्ट्राचं महावस्त्र ..पैठणी म्हणजे वैभव...पैठणी म्हणजे स्त्रीचा अभिमान.....तीचं स्वप्न. खरं तर पैठणीला जवळपास 2 हजार वर्षांपुर्वीचा इतिहास आहे...या 2 हजार वर्षांच्या  काळात ती कित्येक वेळा विस्मृतीत गेली आणि पुन्हा नव्याने जन्मली... पेशव्यांनी पैठणीला दिलेली झळाळी हा अगदी अलिकडचा इतिहास....परंतु आज एकविसाव्या शतकातील स्त्रियांनाही पैठणी आपल्या संग्रही असावी असं वाटणं हेच ते महावस्त्र असल्याचा दाखला... ती साडी नाही..ती आहे ऐश्वर्यसंपन्न पैठणी.......

या पैठणीला नव्यानं ओळख दिली ती झी मराठीच्या होम मिनिस्टरनं....सुमारे १४ वर्षांपूर्वी होम मिनिस्टर सुरू झालं.... पैठणीसाठी दोन गृहिणींमध्ये रंगलेली स्पर्धा महाराष्ट्रानं अक्षरशः डोक्यावर घेतली. या कार्यक्रमामुळे डिझायनर साड्यांच्या जमान्यात महिला पुन्हा पैठणीकडे वळल्या...सलग १४ वर्ष  एक कार्यक्रम त्याच ताकदीनं सुरु राहातो हे यश झी मराठीचंही आणि पैठणीचंही.... या निमित्ताने पैठणीचा व्यवसाय वाढू लागला ..विणकरांच्या हातांना काम मिळालं...हातमाग पुन्हा जिवंत झाले... 

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे लाडके भावोजी स्वतः आदेश बांदेकर त्यांच्या कुटुंबीयांसह येवल्यात पैठणी खरेदीसाठी पोहोचले... समस्त पैठणी व्यावसायिकांनी, कारागिरांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं..येवल्यात गेल्यावर आदेश बांदेकर यांनी काही पैठण्या विकतही घेतल्या. महाऱाष्ट्रातील तमाम वहिन्यांना पैठणी घेउन देणा-या आदेश बांदेकर यांच्या सौ म्हणजेच सुचित्रा बांदेकरही पैठणीच्या चाह्त्या आहे. विविध प्रकारच्या पैठण्या त्यांच्या संग्रही आहेत. 

आज पैठणीचा राजेशाही थाट 'ग्लँमर' मध्ये बदललाय... लग्नसमारंभात दिसणारी पैठणी रँम्पवरही अभिमानाने चालतेय...स्वप्नील शिंदे, वैशाली शडांगुळे, निता लुल्ला हे सुप्रसिद्ध  ड्रेस डिझायनर्स पैठणीला उत्तेजन देण्यासाठी पुढे आले आणि पैठणीला साता समु्द्रापार नेले. 

मराठीच नव्हेतर अनेक अमराठी सेलिब्रिटीही पैठणी घालून मिरवताना दिसतायत. काही वर्षांपुर्वी पुण्यातील रांका ज्वेलर्सने बनवलेली अस्सल सोन्याची पैठणी चर्चेचा विषय ठरली होती. साडी नेसायला कंटाळा कऱणारी आजची पिढी पैठणीचा इव्हिनिंग गाऊन परिधान करतेय...तर कुणी कुर्ता घालून मिरवतेय तर कुणाला तो सुंदर दुपट्टा म्हणून हवाय...कुणाला त्या सोनेरी कडांची पर्स हवीय...तर आठवणींचं कोलाज करण्यासाठी फोटो फ्रेम हवीय....स्वरुप बदलंलंय...परंतु सुमारे २ हजार वर्षांपुर्वीच्या समृद्ध महाराष्ट्राचा इतिहास असलेली पैठणी त्याच थाटात जगतेय याचा आनंद मोठा आहे...